Spread the love

भुसावळ, रावेरसह जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के; अनेक भागांत हादरे!

मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, जीवितहानी वा वित्तहानी नसल्याची प्राथमिक माहिती

भुसावळ : संघरत्न सपकाळे

मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजून १६ मिनिटांनी ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील काही भागांतही जाणवल्याचे वृत्त आहे. जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, सावदा, जामनेर आणि परिसरातील काही गावांमध्ये हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

खरगोन जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र

उपलब्ध प्राथमिक भूकंप नोंदीनुसार, मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सुखपुरी परिसरात भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल, तर जमिनीखालील खोली सुमारे १० किलोमीटर नोंदविण्यात आल्याचे प्राथमिक नकाशावरील तपशीलातून दिसून येत आहे.

अचानक जाणवलेल्या धक्क्यांमुळे काही ठिकाणी नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या चर्चेमुळे परिसरात काही काळ संभ्रम आणि भीतीचे वातावरण होते.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सतर्कतेचे आवाहन

दरम्यान, जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जनहितार्थ सूचना जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाचे धक्के पुन्हा जाणवल्यास घाबरून न जाता सुरक्षित मोकळ्या जागेत जावे. लिफ्टचा वापर टाळावा, अफवा किंवा अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जीवितहानी किंवा वित्तहानी नसल्याची प्राथमिक माहिती

प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे जळगाव जिल्ह्यात अद्याप कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

आपत्कालीन मदतीसाठी संपर्क क्रमांक

  • टोल फ्री क्रमांक : १०७७

  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन : ०२५७-२२१७१९३ / ०२५७-२२२३१८०

  • मोबाइल : ९३७३७८९०६४

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकांवर प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version