Spread the love

संविधान गटांच्या वतीने पुण्यात नेहरू जयंती उत्साहात साजरी!

वनशिववाडी आणि ताडीवाला रोड येथे अभिवादन कार्यक्रम; ताडीवाडीत बालकांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे | प्रतिनिधी

मासूम संविधान संवर्धन फेलोशिप आणि ‘आम्ही भारताचे लोक’ या उपक्रमांतर्गत पुण्यातील वनशिववाडी आणि ताडीवाला रोड परिसरात विविध संविधान गटांच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याचा आणि संविधान निर्मिती प्रक्रियेतील योगदानाचा जागर करण्यात आला.

वनशिववाडीत संविधान निर्मितीतील भूमिकेवर मार्गदर्शन

हृदयमानव अशोक यांच्या नेतृत्वाखाली वनशिववाडी येथील वस्तीवर समानता संविधान गट आणि मैत्री संविधान गट यांच्या वतीने नेहरू जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शोभा वनशिव, माधुरी वनशिव आणि गटाच्या कॅप्टन विश्वजा वनशिव यांनी पंडित नेहरू यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका काय होती, याविषयी हृदयमानव अशोक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधान निर्मितीचा इतिहास आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व यावर त्यांनी प्रकाश टाकला.

ताडीवाला रोडवर बालकांना शालेय साहित्य वाटप

ताडीवाला रोड येथे डॉ. सविताबाई आंबेडकर समता संविधान गट आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट यांच्या वतीनेही नेहरू जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने परिसरातील लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास गटप्रमुख आझाद कवी प्रभू सुनगर, जया सावंत, थोरात परिवार तसेच परिसरातील लहान मुले उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हृदयमानव अशोक यांनी केले, तर कोमल डिसोजा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संविधानिक मूल्यांची ओळख, महापुरुषांच्या विचारांचा जागर आणि मुलांच्या शैक्षणिक प्रोत्साहनाचा संदेश या उपक्रमांतून देण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version