Spread the love

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

वसंत सहकारी साखर कारखाना कॉलनीतील १९७७ ते २००८ या काळातील जवळपास १५० मित्रांचा स्नेहमेळावा उत्साहात; ‘वसाका फाउंडेशन’ स्थापनेचा संकल्प

वनकोठे (ता. एरंडोल, जि. जळगाव) | प्रतिनिधी

दिवाळी म्हटली की दिव्यांची आरास, फराळाचा सुगंध आणि आनंदाचा उत्सव! मात्र यंदाची दिवाळी वसंत सहकारी साखर कारखाना (वसाका) परिवारासाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारी आणि मैत्रीचे ऋणानुबंध अधिक घट्ट करणारी ठरली. ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सन १९७७ ते २००८ या कालावधीत वसाका कर्मचारी वसाहतीत राहिलेल्या जवळपास १५० मित्रांनी एकाच छताखाली एकत्र येत दोन दिवसांचा ‘वसाका कामगार पुत्र स्नेहमेळावा’ उत्साहात साजरा केला. अनेक वर्षांनंतर झालेल्या या भेटीने बालपणीचा काळ पुन्हा जिवंत झाला आणि संपूर्ण परिसर आठवणींच्या आनंदात न्हाऊन निघाला.

‘वसाका फाउंडेशन’ स्थापनेचा संकल्प

या स्नेहमेळाव्यात पाचोरा येथील प्रा. नितीन (रिंकू) यशवंतराव पाटील यांनी ‘वसाका फाउंडेशन’ स्थापन करण्याची कल्पना मांडली. जुन्या मित्रांनी एकमेकांच्या सुख-दुःखात मदतीसाठी पुढे यावे, गरजूंना सहकार्य करावे आणि मित्रांच्या व्यापक नेटवर्कचा उपयोग करून बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा विचार त्यांनी व्यक्त केला. या संकल्पनेला उपस्थित मित्रांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

गुरुजनांच्या विद्यादानाप्रति कृतज्ञता

कारखाना परिसरातील चटईच्या खोलीत भरणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदरणीय गुरुजनांच्या आठवणींनाही या मेळाव्यात उजाळा देण्यात आला. वानखेडे गुरुजी, सौंदाणे गुरुजी, भोई गुरुजी, साबळे गुरुजी आणि शांताराम गुरुजी यांनी अत्यंत निष्ठेने केलेल्या विद्यादानाबद्दल त्यांच्या विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या गुरुजनांनी घडविलेल्या दोन पिढ्यांतील अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर कार्यरत असून, आपल्या यशात गुरुजनांचा मोलाचा वाटा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कुणी २० वर्षांनी, तर कुणी ३० वर्षांनी भेटले!

या मिलन सोहळ्यात कुणी तब्बल २० वर्षांनंतर, तर कुणी ३० वर्षांनंतर आपल्या बालमित्रांना भेटत होते. काळ बदलला, वये वाढली, जबाबदाऱ्या बदलल्या आणि प्रत्येकाची जीवनयात्रा वेगवेगळ्या दिशेने पुढे गेली; मात्र मैत्रीचा धागा कायम राहिला. एकमेकांना पाहताच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेतील खोड्या, बालपणीचे खेळ, एकत्र घालवलेले दिवस, भांडणे, हसणे आणि पुन्हा एकत्र येणे अशा असंख्य आठवणींनी दोन दिवसांचे वातावरण भारावून गेले.

काळाच्या ओघात प्रत्येक जण संसार, व्यवसाय आणि नोकरीच्या जबाबदाऱ्यांत व्यस्त झाला होता. मात्र या मेळाव्याने सर्वांना पुन्हा बालपणीच्या मैत्रीच्या विश्वात नेऊन ठेवले. वयाची बंधने आणि वर्षांचे अंतर विसरून मित्रांनी एकमेकांची विचारपूस केली. हास्यविनोद, गप्पागोष्टी आणि जुन्या आठवणींमध्ये दोन दिवस कसे निघून गेले, हे कोणालाच समजले नाही.

क्रिकेट, स्नेहभोजन आणि मनाचे चार्जिंग!

मेळाव्यात ज्येष्ठ मित्रांनी आपले अनुभव आणि मार्गदर्शनपर विचार मांडले. अनेक वर्षांनी भेटलेल्या मित्रांनी एकत्र क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. स्नेहभोजनाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र वेळ घालवला. सिनियर मित्रांनी दिलेल्या पाठबळामुळे कार्यक्रम अधिक उत्साहात पार पडला. त्याबद्दल सर्व वयोगटांतील मित्रांनी ज्येष्ठांचे आभार मानले.

आधुनिक काळात मोबाईलच्या दुनियेत रमलेल्या मित्रांनी या दोन दिवसांत मोबाईलपासून काहीसा विरंगुळा घेत प्रत्यक्ष भेटीगाठी आणि संवादाला प्राधान्य दिले. यावेळी अनेकांनी व्यक्त केलेली भावना विशेष लक्षवेधी ठरली. “मोबाईलचे चार्जिंग तर रोज करतोच; पण या दोन दिवसांत मित्रांच्या सहवासात मनाचे चार्जिंग झाले,” या एका वाक्यात मेळाव्याचा आनंद आणि मैत्रीचे महत्त्व सामावले होते.

तरुण सहकाऱ्यांच्या परिश्रमातून मेळावा यशस्वी

या स्नेहमेळाव्याच्या आयोजनासाठी चेतन पाटील, यशराज पाटील, नागेश्वर पाटील, दीपक चौधरी, नितीन देशमुख, यतीश पाटील आणि हेमंत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी शिवसेना पारोळा तालुका क्षेत्रप्रमुख मधुकर कौतिक पाटील, शेवगाव येथील केदारेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक किरणदादा शेलार, ‘ॲग्रोवर्ल्ड’चे संपादक शैलेंद्र चव्हाण, डॉ. अजय सोनवणे, डॉ. अमोल चव्हाण, उमेश काकळीज, दुग्ध व्यावसायिक अनिल सुरेश पाटील, छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक सुनील भाऊसाहेब पाटील, उबेद खान, निवृत्त फौजी सुरेश बापू निकम, शनी शिंगणापूर देवस्थानचे रवी निकम, मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील, प्रा. योगेश रंगराव पाटील, भाईंदर येथील साई मंदिराचे पुजारी भूषण मधुकर कुलकर्णी, जळगाव पोलीस दलातील अनिल टाक, गुंतवणूक सल्लागार नितीन देसले, सेतू केंद्रचालक विशाल भोसले आणि केतन खैरनार यांच्यासह अनेक मित्रांनी आवर्जून उपस्थिती नोंदवली.

एकूणच, हा कार्यक्रम केवळ स्नेहमेळावा न ठरता जुन्या नात्यांचा पुनर्मिलाप, आठवणींचा अनमोल ठेवा आणि मैत्रीच्या ऋणानुबंधांचा सुंदर सोहळा ठरला. वर्षानुवर्षे दूर गेलेले मित्र पुन्हा एकत्र आले आणि बालपणीच्या आठवणींनी प्रत्येकाचे मन भरून आले. या भेटीने मैत्रीला नवी ऊर्जा मिळाली असून, ‘वसाका फाउंडेशन’च्या माध्यमातून हे ऋणानुबंध भविष्यातही असेच टिकून राहतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version