Spread the love

ग्वाल्हेरमध्ये मराठा सेवा संघाच्या पंचम राष्ट्रीय अधिवेशनाचा दिमाखदार प्रारंभ!

भव्य रॅली, शिव-शंभू-जिजाऊंच्या विचारांचा जागर; तीन तासांच्या सांस्कृतिक महोत्सवाने ग्वाल्हेर नगरी भारावली

देशभरातील पदाधिकारी, युवक-युवती आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत मुख्य उद्घाटन सोहळा

ग्वाल्हेर, दि. १४ नोव्हेंबर | प्रतिनिधी

मराठा सेवा संघाच्या पंचम राष्ट्रीय अधिवेशनाचा ऐतिहासिक ग्वाल्हेर नगरीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात प्रारंभ झाला. देशभरातील विविध राज्यांतून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवती आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने आयोजित भव्य रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. देशभक्तीपर घोषणा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयघोषाने ग्वाल्हेर नगरी दुमदुमून गेली. भव्य रॅली, महापुरुषांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आणि सलग तीन तास चाललेल्या सांस्कृतिक महोत्सवामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने अधिवेशनाची सुरुवात

ग्वाल्हेर येथील आर्टिस्ट्स कंबाइन नाट्यगृहात आयोजित अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. कर्नाटक मराठा विकास बोर्डाचे अध्यक्ष जी. एच. मारियोजी राव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या अधिवेशनाला देशभरातील राष्ट्रीय पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष व दक्षिण भारताचे प्रमुख सुनील महाजन, उद्योजक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मध्यप्रदेश अध्यक्ष आर. एस. पाटील, उत्तर भारताचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय महासचिव डॉ. सोपानराव क्षीरसागर, ॲड. जयंत शितोळे, शरद चव्हाण, विरेंद्र शिंदे, शिवाजीराव थोरात, सोनल चौहान, निरु वायभासे, उत्तर भारताचे राष्ट्रीय सचिव अभिमन्यू पटेल, वधू-वर कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. एन. पाटील, पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील, प्रबोधन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी राजे पाटील, विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव कपिल पिच्छेवार, जिल्हे सिंह खैची आणि डॉ. परमलसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.

धुळे येथील वधू-वर सूचक कक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ. जयश्री पाटील आणि सौ. सुनीता पाटील यांनीही अधिवेशनात सक्रिय सहभाग नोंदविला.

तीन तासांच्या सांस्कृतिक महोत्सवाने रसिक मंत्रमुग्ध

अधिवेशनाच्या प्रारंभी मध्यप्रदेश अध्यक्ष आर. एस. पाटील यांनी प्रास्ताविकातून पंचम राष्ट्रीय अधिवेशनाची भूमिका, उद्दिष्टे आणि मराठा सेवा संघाच्या संघटनात्मक वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

या अधिवेशनाचे विशेष आकर्षण ठरले ते देशभरातून आलेल्या युवक-युवती आणि महिलांनी सादर केलेले सलग तीन तासांचे सांस्कृतिक कार्यक्रम. विविध नृत्यप्रकार, गायन, देशभक्तीपर सादरीकरणे आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या कलाविष्कारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

संघटनात्मक एकजूट, सांस्कृतिक वैभव आणि युवकांच्या कलागुणांचा प्रभावी आविष्कार यामुळे अधिवेशनाच्या प्रारंभाला विशेष उंची प्राप्त झाली.

आज केंद्रीय मंत्री सिंधिया व मुख्यमंत्री डॉ. यादव यांच्या उपस्थितीत उद्घाटन

पंचम राष्ट्रीय अधिवेशनाचा मुख्य उद्घाटन सोहळा रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव राहणार असून, विशेष अतिथी म्हणून मध्यप्रदेशचे मंत्री लखन पटेल, खासदार ज्ञानेश्वर पाटील, राज्यसभा सदस्य डॉ. रामराव वाडकुते, आमदार मारोतीराव मुळे तसेच कर्नाटकातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे केंद्रीय संचार व ईशान्य क्षेत्र विकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

मराठा संघासमोरील आव्हाने आणि परिवर्तनावर विचारमंथन

अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात ‘मराठा संघासमोरील आव्हाने आणि परिवर्तनाचे प्रयत्न’ या महत्त्वपूर्ण विषयावर विचारमंथन होणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ॲड. आकाश काकडे राहणार असून, विशेष अतिथी म्हणून धुळे येथील राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील सहभागी होणार आहेत.

या चर्चेतून संघटनेसमोरील वर्तमान आव्हाने, सामाजिक परिवर्तनाची गरज, संघटनात्मक विस्तार आणि आगामी कार्यदिशा यावर विचारांची देवाणघेवाण होणार आहे.

सामाजिक परिवर्तन आणि संघटनात्मक विस्ताराचा नवा संकल्प

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासोबतच सामाजिक प्रबोधन, युवकांचे सक्षमीकरण, महिलांचा सहभाग, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक एकजूट या उद्दिष्टांना अधिवेशनातून नवी दिशा देण्याचा प्रयत्न होत आहे.

ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक भूमीतून सामाजिक परिवर्तनाचा विचार, संघटनात्मक बांधिलकी आणि नव्या पिढीच्या सक्रिय सहभागाचा संदेश देत मराठा सेवा संघाच्या पंचम राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे. आगामी सत्रांतील विचारमंथनातून संघटनेच्या भावी वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण दिशा निश्चित होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version