युवकांच्या आव्हानांना साथ द्या; युवकांना मराठा सेवा संघाशी जोडून सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतिमान करा – डॉ. संजय पाटील
ग्वाल्हेर येथील पंचम राष्ट्रीय अधिवेशनातील द्वितीय सत्रात युवकांचे प्रश्न, नेतृत्व विकास आणि संघटनेच्या भविष्यकालीन वाटचालीवर विचारमंथन
ग्वाल्हेर (प्रतिनिधी) : युवकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. युवकांना मराठा सेवा संघाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान करा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे उत्तर भारताचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी केले.
मराठा सेवा संघाच्या पंचम राष्ट्रीय अधिवेशनात आयोजित द्वितीय सत्रात ‘मराठा सेवा संघापुढील आव्हाने व परिवर्तनाची पहल’ या विषयावर विचारप्रवर्तक परिसंवाद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. युवकांचे प्रश्न, संघटनेची बदलती भूमिका आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा यावर या परिसंवादात सखोल चर्चा करण्यात आली.
युवकांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करण्याची गरज
परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय पाटील होते, तर विशेष अतिथी म्हणून अॅड. जयंत शितोळे उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे विधीज्ञ अॅड. आकाश काकडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून युवकांसमोरील शिक्षण, रोजगार, नेतृत्व विकास आणि विविध सामाजिक प्रश्नांवर प्रभावी भाष्य केले. युवकांच्या बदलत्या अपेक्षा आणि आव्हाने लक्षात घेऊन संघटनेने आपल्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणावेत, असे आवाहन त्यांनी केले.
युवकांना केवळ संघटनेच्या कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घ्यावे. त्यांना वैचारिक दिशा, नेतृत्वाच्या संधी आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सक्रिय भूमिका द्यावी. युवकांच्या क्षमता आणि ऊर्जेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास संघटनेची चळवळ अधिक व्यापक व गतिमान होईल, असे प्रतिपादन अॅड. आकाश काकडे यांनी केले.
फुले-शाहू-आंबेडकर आणि शिव-शंभूंचे विचार कृतीत उतरवा!
अध्यक्षीय मनोगतात डॉ. संजय पाटील यांनी मराठा सेवा संघाने आत्मपरीक्षणातून परिवर्तनाची नवी दिशा स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. फुले-शाहू-आंबेडकर आणि शिव-शंभू यांच्या विचारांचा केवळ जयघोष करून चालणार नाही, तर हे विचार सामाजिक व्यवहारात उतरविणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संघटनेची समीक्षा ही कमजोरी नसून संघटनेच्या बळकटीकरणाची सुरुवात आहे. वैचारिक प्रशिक्षण, युवा व महिला नेतृत्व विकास, सामाजिक प्रश्नांवरील ठोस कार्य आणि पारदर्शक संवाद यांच्या माध्यमातून विचारवान कार्यकर्ते व परिवर्तनवादी नेतृत्व घडविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सदस्यसंख्येपेक्षा सामाजिक परिवर्तन महत्त्वाचे
संघटनेचा विस्तार केवळ सदस्यसंख्येवरून नव्हे, तर समाजात घडणाऱ्या सकारात्मक परिवर्तनावरून मोजला गेला पाहिजे. इतिहासाचा गौरव करतानाच वर्तमानातील सामाजिक आव्हानांना सामोरे जाऊन भविष्याचा प्रगतिशील समाज घडविण्याची जबाबदारी मराठा सेवा संघाने स्वीकारली पाहिजे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
युवकांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आणि त्यांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणणे, यातूनच सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक सक्षम होईल, असा प्रबोधनात्मक संदेश त्यांनी दिला.
संघटनेच्या भावी वाटचालीसाठी नवी दिशा
या परिसंवादातून मराठा सेवा संघाच्या भावी वाटचालीसाठी आत्मपरीक्षण, वैचारिक परिवर्तन, युवा नेतृत्व विकास आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण दिशा अधोरेखित झाली. युवकांच्या ऊर्जेला सामाजिक परिवर्तनाच्या कार्याशी जोडण्याचा विचार या सत्रातून पुढे आला.
