Spread the love

निवडणुकीत दिलेला शब्द पाळला! ठाणा व वरखेडी खुर्द येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचे अनावरण

इद्रीस मुलतानी यांच्या पुढाकारातून दोन्ही गावांमध्ये महामानवाला अभिवादन; ग्रामस्थांकडून आभार व्यक्त

सोयगाव | प्रतिनिधी – शिवराम जाधव

सोयगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत इद्रीस मुलतानी यांच्या पुढाकारातून सोयगाव तालुक्यातील ठाणा आणि वरखेडी खुर्द या दोन्ही गावांमध्ये महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण झाल्याने दोन्ही गावांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा महान विचार दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ठाणा व वरखेडी खुर्द येथील ग्रामस्थांनी गावात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

आश्वासनाची प्रत्यक्ष कृतीतून पूर्तता

जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात इद्रीस मुलतानी यांनी ग्रामस्थांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. ठाणा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे वरखेडी खुर्द येथेही उत्साहपूर्ण वातावरणात अनावरण सोहळा पार पडला. दोन्ही गावांमध्ये महामानवाच्या पुतळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

‘जनतेची सेवा हेच आमचे ध्येय’ – इद्रीस मुलतानी

यावेळी इद्रीस मुलतानी म्हणाले, “महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत. ठाणा व वरखेडी खुर्द येथील ग्रामस्थांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पूर्ण करता आला, याचे मनापासून समाधान आहे. जनतेची सेवा हेच आमचे ध्येय असून, जनसामान्यांना कोणत्याही अडचणीच्या वेळी किंवा कोणत्याही कामासाठी अगदी अर्ध्या रात्रीसुद्धा एक फोन करा; आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव हजर आहोत.”

या अनावरण सोहळ्याला दोन्ही गावांतील ग्रामस्थ, महिला, युवक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी इद्रीस मुलतानी यांचे आभार व्यक्त केले.

इद्रीस मुलतानी यांचा परिचय :
मुस्लिम पासमांदा समाज अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री दर्जा) तथा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष.

Share.
Leave A Reply

Exit mobile version