वाघोदे बु. ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी राजकीय हालचालींना वेग!
उपसरपंचपदाच्या शर्यतीत पाच सदस्यांची नावे चर्चेत; बहुमतासाठी गुप्त बैठका आणि मोर्चेबांधणी सुरू
रावेर (प्रतिनिधी – अक्षय वाघ) :
रावेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या वाघोदे बुद्रुक ग्रामपंचायतीत सध्या उपसरपंचपदाच्या निवडीचे वेध लागले आहेत. या प्रतिष्ठेच्या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले असून, संभाव्य उमेदवारांच्या नावांवरून गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
पाच सदस्यांची नावे चर्चेत
उपसरपंचपदाच्या शर्यतीत आनंद भालेराव, संजू माळी, महेंद्र काळे, वाहिद मलिक आणि सुपाडू वाघ या पाच सदस्यांची नावे जोरदार चर्चेत आहेत. या पदासाठी प्रत्येक सदस्याकडून आपापल्या बाजूने बहुमत जुळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. इतर सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी गुप्त बैठका आणि राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाल्याचेही बोलले जात आहे.
बिनविरोध निवडीकडे की निवडणुकीकडे?
गावाच्या विकासकामांमध्ये उपसरपंचपदाला महत्त्वाचे स्थान असल्याने या निवडीकडे ग्रामस्थांचे विशेष लक्ष लागले आहे. ऐनवेळी सर्व सदस्यांमध्ये एकमत होऊन निवड बिनविरोध पार पडणार की उपसरपंचपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पाच सदस्यांची नावे चर्चेत आल्याने वाघोदे बुद्रुक ग्रामपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, अंतिम निवड कोणाच्या बाजूने झुकते, हे निवड प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
