खपाट शिवारात बिबट्याचे दर्शन; तीन गावांतील ग्रामस्थांमध्ये घबराट!
वनविभागाच्या पाहणीत बिबट्याच्या वावराला दुजोरा; वनरक्षकांकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
धरणगाव (प्रतिनिधी) :
धरणगाव तालुक्यातील खपाट शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. अवघ्या दहा फूट अंतरावरून बिबट्या रस्ता ओलांडताना दिसल्याने खपाटसह पिंपळे सिम आणि बोरखेडा गावांतील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनरक्षक डी. एस. पवार यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
शेतातून परतताना शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास खपाट येथील शेतकरी अमोल पाटील आणि विठ्ठल झावरू लोखंडे हे शेतीची कामे आटोपून घराकडे परतत होते. गावातील गोपाळ नथू पाटील यांच्या तुरीच्या शेताजवळ आले असता, अवघ्या दहा फूट अंतरावरून बिबट्या रस्ता ओलांडताना त्यांना दिसला. अचानक समोर बिबट्या आल्याने दोन्ही शेतकरी भयभीत झाले. त्यांनी तातडीने गावात धाव घेत ग्रामस्थांना तसेच स्थानिक पोलीस पाटील गडबड अहिरे यांना घटनेची माहिती दिली.
वनविभागाकडून पाहणी; बिबट्याच्या वावराला दुजोरा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पाटील गडबड अहिरे यांनी तातडीने एरंडोल वनविभागाशी संपर्क साधला. त्यानुसार, सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पिंपळकोठा येथील वनरक्षक डी. एस. पवार आणि वनमजूर लखन मुरलीधर लोळणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील शेतांची पाहणी केली. या पाहणीनंतर संबंधित प्राणी बिबट्याच असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी खपाट, पिंपळे सिम आणि बोरखेडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनरक्षकांकडून शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना
वनरक्षक डी. एस. पवार यांनी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने न जाण्याचा, शेतात जाताना सोबत बॅटरी आणि काठी ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच गायी, बकऱ्या आणि इतर पाळीव प्राण्यांना सुरक्षित व बंदिस्त जागेत बांधून ठेवण्याच्या सूचनाही केल्या.
बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
