भुसावळात मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न!
महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत उपक्रम; महिलांना स्वयंरोजगाराची नवी संधी, आर्थिक स्वावलंबनाला मिळणार चालना
भुसावळ (प्रतिनिधी – प्रमोद पाटील) :
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे आणि त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भुसावळ नगरपालिका व आस बहुउद्देशीय विकास संस्था, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गरुड प्लॉट येथे आयोजित हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी रजनीताई सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ब्युटी पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे महिलांनी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होण्यावर भर द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महिला व बालकल्याण सभापती शोभाताई रणधीर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच आस बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष महेंद्र दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास मीना ताई लोणारी, अर्चना सातदिवे, सीमा ताई नरवाडे, सोनल महाजन, सविता मकासारे, दीपाली बऱ्हाटे, वैशाली शेतवाल आणि वैशाली मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात शहरातील मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना ब्युटी पार्लर व्यवसायाचे मूलभूत ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. या कौशल्याच्या बळावर महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण करू शकतील. अशा उपक्रमांमुळे महिला सक्षमीकरणाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस बहुउद्देशीय विकास संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
