Spread the love

बिजरी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी!

शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय आणि विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा गौरव; नव्या पिढीला प्रेरणा देणारा उपक्रम

धडगाव (प्रतिनिधी) : ब्रिटिश सत्तेविरुद्ध ऐतिहासिक उलगुलान पुकारणारे आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक आणि जननायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती बिजरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून गावातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेत नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवण्यात आला.

यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू, वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकपदी निवड झालेले शिक्षक, इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत गावातून प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी तसेच नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गुणवंतांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम ग्रामस्थांच्या पुढाकारातून राबविण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार येथील कृषी अधिकारी श्री. वसंत वळवी आणि विधिज्ञ ॲड. सारपा वळवी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिजरीच्या सरपंच सौ. मोगरा ताई पटले होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. दिलीप एन. पटले सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा, बिजरी येथील विद्यार्थिनींनी स्वागतगीत आणि सांस्कृतिक गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर करत त्यांच्या संघर्षमय इतिहासाला उजाळा दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र वसावे यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप पटले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप एन. पटले, दिलीप व्ही. पटले, विजय पटले, दारासिंग दादा पटले, महेंद्र वसावे आणि संदीप पटले यांनी विशेष परिश्रम घेतले. गावातील नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्रमंडळ आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

गुणवंतांचा सन्मान म्हणजे गावाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या त्याग, संघर्ष, स्वाभिमान आणि समाजजागृतीच्या विचारांना अभिवादन करत गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम बिजरी ग्रामस्थांसाठी अभिमानाचा ठरला. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत प्रगती करण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version