Spread the love

धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अवैध धंदे तातडीने बंद करा!

गुटखा तस्करी, सट्टा-जुगार, अवैध दारू आणि अमली पदार्थांच्या व्यवसायाविरोधात शिवसेना उबाठाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; कारवाईचे आश्वासन

धुळे (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करून संबंधित व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ग्रामीण भागात गुटखा तस्करी, सट्टा-जुगार, पत्त्यांचे क्लब, अवैध दारू निर्मिती व विक्री तसेच अमली पदार्थांच्या विक्रीचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यात अपुरा आणि अनियमित पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांना बसत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती असून, अनेक शेतकरी कुटुंबांचे आर्थिक जीवनमान शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र, पावसाचे प्रमाण आणि वितरण समाधानकारक नसल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतीचे उत्पन्न घटले असतानाही मुला-मुलींचे शिक्षण, विवाह, आरोग्य, घरखर्च, शेतीचा खर्च आणि कर्जाची परतफेड अशा जबाबदाऱ्या शेतकरी कुटुंबांसमोर कायम आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत अवैध धंद्यांचे जाळे ग्रामीण भागात पसरत असल्याने तरुण पिढी आणि शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात गुटखा तस्करीचे जाळे पसरल्याचा आरोप

धुळे शहरातील गुटख्याचा माल आता ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये पोहोचविला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या तस्करीसाठी ग्रामीण भागातील वेगवेगळ्या गावांमध्ये हप्ते गोळा करण्यासाठी एजंट नेमण्यात आल्याचेही निवेदनात नमूद आहे. याशिवाय तालुक्यांच्या प्रमुख ठिकाणी आणि मोठ्या बाजारपेठांच्या गावांमध्ये सट्टा, अमली पदार्थांची विक्री आणि पत्त्यांचे क्लब सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. अवैध दारू निर्मिती व विक्रीमुळेही ग्रामीण भागातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीत शासनाकडून शेतकरी व नागरिकांना विविध योजनांद्वारे दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे अशा अवैध व्यवसायांमुळे व्यसनाधीनतेला प्रोत्साहन मिळत आहे. कष्टाने मिळविलेला पैसा व्यसनांमध्ये खर्च होण्याचा धोका असून, शेतकरी कुटुंबांतील तरुणांची आर्थिक परिस्थिती आणखी खालावू शकते, अशी चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

धुळे शहरात अवैध धंद्यांवर पोलिसांनी वचक निर्माण केला असला, तरी ग्रामीण भागातील तालुक्यांची प्रमुख ठिकाणे आणि बाजारपेठांच्या गावांमध्ये हे प्रकार सुरू असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रमुख गावांमध्ये विशेष मोहीम राबवून अवैध धंदे तातडीने बंद करावेत, संबंधित चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत आणि या व्यवसायांना पाठबळ देणाऱ्यांचाही शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ग्रामीण भागातील अवैध धंदेही बंद करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, निंबा मराठे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, हेमराज पाटील, संदीप सूर्यवंशी, आनंद जावडेकर, अण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, शांताराम माळी, गजेंद्र पाटील, अजय चौधरी, कपिल लिंगायत, गुलाब धोबी आदी उपस्थित होते.

— अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

Share.
Leave A Reply

Exit mobile version