बिरसा मुंडा जयंती सप्ताहातून सल्लीबारमध्ये ग्रामविकासाचा जागर!
‘जोहार ग्रुप’चा अनोखा उपक्रम; लोकसंवाद, आरोग्य तपासणी आणि सामाजिक प्रबोधनातून ग्रामएकतेचा सातपुड्यात आदर्श
धडगाव (प्रतिनिधी) | दि. १६ नोव्हेंबर : गावाच्या विकासासाठी युवक, कर्मचारी आणि सुजाण नागरिक एकत्र आले, तर परिवर्तनाची प्रभावी चळवळ उभी राहू शकते, याचा प्रत्यय सल्लीबार येथे आला. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मजयंती सप्ताहानिमित्त गावातील कर्मचारी आणि युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘जोहार ग्रुप’च्या माध्यमातून लोकसंवाद, आरोग्य तपासणी आणि सामाजिक प्रबोधनाचे विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामएकतेचा हा उपक्रम सातपुड्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
गावातील प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांची आणि अधिकारांची जाणीव व्हावी, आदिवासी क्रांतिकारकांचा संघर्षमय इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, स्थानिक संस्कृतीचे जतन व्हावे, तसेच महिला सक्षमीकरण, शिक्षण, स्थलांतर, बेरोजगारी आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर जनजागृती व्हावी, हा ‘जोहार ग्रुप’चा प्रमुख उद्देश आहे. याच ध्येयातून जयंती सप्ताहाचे औचित्य साधून ग्रामविकासाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
‘मी पण भारताचा नागरिक, प्रश्न विचारणे आमचा अधिकार’
या उपक्रमांतर्गत १३ नोव्हेंबर रोजी सल्लीबार येथील कोतवालपाडा येथे ‘मी पण भारताचा नागरिक आणि प्रश्न विचारणे आमचा अधिकार’ या ब्रीदवाक्याखाली लोकसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कवी तथा विधिज्ञ ॲड. सुभाष वळवी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. नागरिकांना आपल्या समस्या, प्रश्न आणि अपेक्षा मोकळेपणाने मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग आणि प्रश्न विचारण्याचे महत्त्व यावरही संवाद साधण्यात आला.
माथेआंबापाड्यात आरोग्य तपासणी आणि सिकलसेलबाबत जनजागृती
गावाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन १५ नोव्हेंबर रोजी माथेआंबापाडा येथे दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या सत्रात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. विशेषतः आदिवासी भागात आढळणाऱ्या सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. या आजाराची माहिती, प्रतिबंधात्मक उपाय आणि नियंत्रण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रक्त तपासणीही करण्यात आली.
सायंकाळच्या सत्रात लोकसंवाद आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. ग्रामस्थांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि गावाच्या विकासाशी संबंधित विविध सामाजिक प्रश्नांवर आपले विचार मांडले. अशा संवादातून गावातील समस्या समजून घेण्यास आणि त्यावर सामूहिक उपाययोजना शोधण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इंद्रसिंग वळवी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सुभाष वळवी, निर्मला राऊत, संदीप वळवी आणि स्वप्नील वळवी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. धिरसिंग नाईक सर होते. गावातील आजी-माजी सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
युवकांच्या पुढाकारातून ग्रामएकतेचा संदेश
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोहार ग्रुपचे संचालक, गावातील कर्मचारी वर्ग, उत्तम पोलीस, नारसिंग पोलीस, वनरक्षक संजय वळवी, सामाजिक कार्यकर्ते अनिल वळवी, इंद्रसिंग वळवी, आकाश वळवी, उमेश वळवी, शंकर वळवी, संदीप वळवी, सचिन वसावे, अभिजित वळवी, विवेक वळवी, भरत वळवी, लालसिंग वळवी, चंद्रसिंग वळवी आणि पोलीस पाटील भीमसिंग वळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.
गावाच्या विकासासाठी एकजूट, लोकसहभाग आणि जागरूक नागरिकत्व हाच परिवर्तनाचा खरा मार्ग आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या संघर्ष, स्वाभिमान आणि समाजजागृतीच्या विचारांचा जागर करत ‘जोहार ग्रुप’ने सल्लीबारमध्ये लोकजागृतीची नवी दिशा निर्माण केली आहे. युवकांच्या या सामाजिक पुढाकाराचे परिसरातून कौतुक होत आहे.
