साक्रीत उसाच्या शेतात बिबट्याची तीन नवजात पिल्ले आढळली; परिसरात खळबळ!
नांदवन शिवारातील घटना; वनविभागाकडून पिल्ले सुरक्षित, मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावले
साक्री (प्रतिनिधी) : साक्री तालुक्यातील नांदवन शिवारात उसाच्या शेतात बिबट्याची अवघ्या आठ ते दहा दिवसांची तीन नवजात पिल्ले आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऊसतोड कामगारांना ही पिल्ले दिसताच त्यांनी शेतमालकाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पिल्लांना सुरक्षित केले असून, परिसरात कॅमेरे लावून मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
कासारे येथील विजय दगाजी देसले यांचे नांदवन शिवारात उसाचे शेत आहे. या शेतात ऊसतोड कामगार काम करत असताना दुपारच्या सुमारास त्यांना बिबट्याची तीन पिल्ले दिसली. अचानक पिल्ले आढळल्याने कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यांनी तातडीने शेतमालक विजय देसले आणि रोहिदास पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोघांनीही वनविभागाशी संपर्क साधला.
माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. बिबट्याची पिल्ले सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली असून, त्यांच्या आईचा शोध घेण्यासाठी परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहेत. पिल्ले आढळल्यामुळे याच परिसरात मादी बिबट्याचा वावर असण्याची शक्यता वनविभागाने लक्षात घेतली आहे.
शेतकरी आणि ऊसतोड कामगारांना सतर्कतेचे आवाहन
उसाच्या दाट शेतात बिबट्याची पिल्ले आढळल्याने परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात बिबट्याचा वावर वारंवार जाणवत असल्याने वनविभागाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी आणि ऊसतोड कामगारांनी शेतात जाताना विशेष खबरदारी घ्यावी. पिल्लांना हात लावू नये किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. परिसरात बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मादी बिबट्या पिल्लांच्या संरक्षणासाठी आसपास असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
