पारोळ्यात श्री राजराजेश्वर सहस्रार्जुन भगवान जयंती उत्साहात साजरी!
भव्य मिरवणूक, प्रतिमापूजनासह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; सोमवंशी क्षत्रिय समाजाचा स्तुत्य उपक्रम
पारोळा (प्रतिनिधी : संदीप पाटील)
श्री राजराजेश्वर सहस्रार्जुन भगवान यांच्या जयंतीनिमित्त श्री सोमवंशी क्षत्रिय समाज पंचमंडळ, पारोळा यांच्या वतीने जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित भव्य मिरवणूक, प्रतिमापूजन व अभिवादन सोहळा तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत बी. पाटील, उपनगराध्यक्ष रोहनदादा मोरे, मुख्याधिकारी तुषारजी नेरकर, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, भाजपा चिटणीस धीरजभाऊ महाजन, माजी उपनगराध्यक्ष दीपकभाऊ अनुष्ठान, सुदाम बापू चौधरी, नगरसेवक अमोलदादा शिरोळे, भावडूभाऊ राजपूत, गोपालशेठ दाणेज, राजूभाऊ कासार, भूषणभाऊ टीपरे, पंकजभाऊ मराठे, संदेशभाऊ शिरोळे आणि विनोदभाऊ पाटील यांनी उपस्थित राहून श्री राजराजेश्वर सहस्रार्जुन भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मान्यवरांनी अभिवादन करून जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला समाजाचे अध्यक्ष जगदीशभाऊ आफ्रे, केशवशेठ क्षत्रिय, ॲड. कृतिका आफ्रे यांच्यासह क्षत्रिय समाज पंचमंडळ, महिला मंडळ आणि नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजबांधव आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शिक्षणाला प्रोत्साहन
जयंती महोत्सवाचे औचित्य साधून समाजातील शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा मिळाली.
धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची सांगड घालणाऱ्या या आयोजनातून समाजातील एकता, संघटन आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. भव्य मिरवणूक, प्रतिमापूजन, मान्यवरांची उपस्थिती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अशा विविध उपक्रमांनी जयंती महोत्सव उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
