Spread the love

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध!

शिवसेना शिंदे गटाचे ६, भाजपचे ३ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २ उमेदवार बिनविरोध; पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजनांसह दिग्गजांचा समावेश

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये झालेल्या समन्वयातून बँकेच्या एकूण जागांपैकी ११ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) चे सहा, भारतीय जनता पक्षाचे तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या घडामोडींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सकाळी अकरा वाजेनंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारांची गर्दी झाली होती. कोण माघार घेणार आणि कोण निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. अखेर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी केलेल्या चर्चेतून आणि राजकीय समन्वयातून ११ जागांवरील संभाव्य लढती टळल्या.

शिवसेना शिंदे गटाचे सहा उमेदवार बिनविरोध

या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) च्या सर्वाधिक सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. यामध्ये राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा येथील सुमित किशोर पाटील, अनुसूचित जाती प्रवर्गातून आमदार चंद्रकांत सोनवणे आणि भडगाव येथील सोमसिंग खुमानसिंग पाटील यांचा समावेश आहे.

याशिवाय पाचोरा येथील आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल अमोल पाटील आणि त्यांच्या मातोश्री नलिनी चिमणराव पाटील (पारोळा) यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला सहा जागांवर प्रतिनिधित्व मिळाले आहे.

भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध

भारतीय जनता पक्षाचेही तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जामनेरमधून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, चोपडा येथून रोहित निकम आणि भुसावळमधून रजनी सावकारे यांनी बिनविरोध निवड निश्चित केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या निवडीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. धरणगाव येथून सोनल संजय पवार यांची अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी निवड निश्चित झाली, तर अमळनेर येथील जयश्री अनिल पाटील यांची माघारीच्या एक दिवस आधीच बिनविरोध निवड झाली होती.

महायुतीतील समन्वयाची चर्चा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी समन्वयाची भूमिका घेतल्याचे अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी स्पष्ट झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी केलेल्या चर्चांमुळे अनेक ठिकाणी संभाव्य लढती टळल्या. त्यामुळे तिन्ही पक्षांना आपापल्या राजकीय प्रभावक्षेत्रातील उमेदवार बिनविरोध निवडून आणता आले.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची संस्था आहे. शेतकरी, सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या आणि ग्रामीण पतपुरवठ्याच्या दृष्टीने बँकेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळातील प्रतिनिधित्वाला सहकार क्षेत्रासोबतच जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झाले आहे.

अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी ११ जागांवरील बिनविरोध निवडी निश्चित झाल्या असल्या, तरी उर्वरित जागांवरील निवडणूक प्रक्रिया अद्याप महत्त्वाची आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचे अंतिम चित्र आणि सत्तेचे समीकरण काय असेल, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version