Spread the love

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी परभणीत सोमवारी भरती मेळावा!

नामांकित आस्थापनांचा सहभाग; निवड झालेल्यांना दरमहा १० ते १६ हजार रुपयांपर्यंत विद्यावेतनाची संधी

परभणी, दि. १७ (प्रतिनिधी : रामचंद्र अन्नदाते) : जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण युवक-युवतींसह अंतिम वर्षात प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजना आणि प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत परभणी येथे सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), परभणी येथे हा मेळावा होणार आहे.

मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, परभणी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात विविध नामांकित आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, पात्र उमेदवारांची शिकाऊ उमेदवारीसाठी निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १० हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

नामांकित आस्थापनांमध्ये कामाचा अनुभव मिळणार

छत्रपती संभाजीनगर, पुणे यांसह राज्यातील विविध भागांतील नामांकित आस्थापना या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्थानिक युवक-युवतींना नामांकित आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळविण्याची संधी मिळणार आहे. तसेच तांत्रिक कौशल्य विकसित करून भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला सक्षम करण्याची संधीही या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवार, अंतिम वर्षात प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी तसेच इतर पात्र युवक-युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह भरती मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार विकास आडे यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version