अमृत योजनेचे काम रखडविणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा!
भुसावळ अमृत टप्पा-२ योजनेचे ५० टक्केही काम अपूर्ण; ठेकेदारांकडून काम काढून दंडात्मक कारवाई करण्याची केदारनाथ सानप यांची मागणी
भुसावळ (प्रतिनिधी : संघरत्न सपकाळे) : भुसावळ शहरातील अमृत टप्पा-२ योजनेचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित ठेकेदारांकडून काम काढून घेऊन नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, भुसावळ येथील अमृत टप्पा-२ योजनेचे काम एडके आणि विलास पाटील असोसिएट या ठेकेदारांकडे सोपविण्यात आले आहे. या कामाची निर्धारित मुदत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी संपली आहे. मात्र, मुदत संपूनही योजनेचे ५० टक्के कामसुद्धा पूर्ण झालेले नसल्याचा आरोप केदारनाथ सानप यांनी केला आहे.
मुदत संपूनही काम अपूर्ण; नागरिकांना मनस्ताप
भुसावळ तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता अमृत योजनेचे काम प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कामातील विलंबामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ठेकेदारांच्या आर्थिक स्वार्थामुळे जाणीवपूर्वक योजना रखडवली जात असल्याचा आरोपही सानप यांनी केला आहे.
दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठ्याशी संबंधित महत्त्वाची योजना वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदारांकडून कामाची मुदत पाळली जात नसल्याने भुसावळकरांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात असल्याचे सानप यांनी निवेदनात नमूद केले आहे.
काम काढून घेऊन काळ्या यादीत टाकण्याची मागणी
अमृत टप्पा-२ योजनेचे रखडलेले काम लक्षात घेता संबंधित ठेकेदारांकडून काम काढून घ्यावे, त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी आणि त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आता या निवेदनावर जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.
