Spread the love

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी भुसावळात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळवाटप!

शिवसेना शहरप्रमुख गणेश चौधरी यांच्या पुढाकारातून कृष्णानगरात सामाजिक उपक्रम; ‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ या शिकवणीला अभिवादन

भुसावळ प्रतिनिधी | प्रमोद पाटील

हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळ शहरात शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख गणेश चौधरी यांच्या आयोजनातून कृष्णानगर परिसरातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून बाळासाहेबांच्या समाजसेवेच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कृष्णानगर परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि अन्य आवश्यक शालेय साहित्य तसेच पौष्टिक फळांचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या सामाजिक उपक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिभाताई, विधानसभा संपर्कप्रमुख बालाजी पठाडे, जगदाळे, सहसमन्वयक व तालुका संघटक अनिल महाजन, महिला आघाडी शहरप्रमुख पल्लवीताई जैन आणि शहर संघटक सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच उपशहरप्रमुख राकेश खराडे, उपशहरप्रमुख नवी दादा पटेल, रेल कामगार सेनेचे ललित मुथा, प्राध्यापक उत्तमराव सुरवाडे, कट्टर शिवसैनिक नमा शर्मा, समाजसेवक विलास जाधव, बल्लाळेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश चौधरी, दीपक सूर्यवंशी, शिवसैनिक विशाल अत्रे, थार्वेस किरणगे आणि ओम सोनवणे यांच्यासह कृष्णानगर परिसरातील नागरिक, लहान मुले, महिला आघाडीच्या सदस्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजसेवेच्या माध्यमातून स्मृतिदिनाला अभिवादन

कार्यक्रमाचे नियोजन शहरप्रमुख गणेश चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळांचे वाटप करून स्मृतिदिन सामाजिक बांधिलकी जपत साजरा केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version