Spread the love

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; १२ जागा बिनविरोध!

शिवसेनेचे सहा, भाजपचे चार तर राष्ट्रवादीचे दोन संचालक बिनविरोध; उर्वरित आठ मतदारसंघांतील नऊ जागांसाठी रंगणार निवडणूक

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून, तब्बल १२ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये महायुतीतील घटक पक्षांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. बिनविरोध झालेल्या जागांमध्ये शिवसेनेचे सहा, भाजपचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवारांचा समावेश आहे.

दुसरीकडे, आठ मतदारसंघांतील नऊ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार असल्याने जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष या लढतींकडे लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी माघारीनंतर निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली.

शिवसेनेचे सहा संचालक बिनविरोध

बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये शिवसेनेच्या सहा उमेदवारांचा समावेश आहे. धरणगाव विकासो मतदारसंघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील, अनुसूचित जमाती प्रवर्गातून आमदार चंद्रकांत सोनवणे, पाचोरा विकासो मतदारसंघातून सुमित पाटील, भडगावमधून सोमसिंग खुमानसिंग पाटील, एरंडोलमधून मृणाल अमोल पाटील आणि पारोळा मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध

भाजपने चार जागांवर बिनविरोध निवड मिळवली आहे. जामनेर विकासो मतदारसंघातून मंत्री गिरीश दत्तात्रय महाजन, भुसावळमधून रजनी संजय सावकारे, चोपड्यातून रोहित दिलीप निकम आणि बोदवडमधून मधुकर रामचंद्र राणे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमळनेर विकासो मतदारसंघातून जयश्री अनिल पाटील आणि धरणगाव विकासो मतदारसंघातून सोनल संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आठ मतदारसंघांतील नऊ जागांसाठी लढती

बिनविरोध निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता आठ मतदारसंघांतील नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये मुक्ताईनगर, यावल, रावेर, चाळीसगाव, महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर सहकारी संस्था या मतदारसंघांचा समावेश आहे.

मुक्ताईनगर : तालुका विकासो प्रतिनिधी मतदारसंघातून खासदार रक्षा निखिल खडसे आणि देवयानी चंद्रकांत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे.

यावल : या मतदारसंघात प्रशांत लिलाधर चौधरी, गणेश गिरधर नेहेते, रामदास गोंडू पाटील आणि विनोदकुमार पंडितराव पाटील असे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

रावेर : राजेंद्र पंढरीनाथ चौधरी, योगीराज गबाजी पाटील आणि रमेश नगराज पाटील यांच्यात लढत होणार आहे.

चाळीसगाव : तालुका विकासो प्रतिनिधी मतदारसंघात आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्यासमोर नारायण नथू पाटील आणि विजय भिकनराव पाटील यांचे आव्हान असणार आहे.

महिला प्रतिनिधी : या मतदारसंघातील दोन जागांसाठी माधुरी चंद्रशेखर अत्तरदे, ज्योती नाना पाटील, पुनम प्रशांत पाटील आणि सुलोचना भगवान पाटील या चार उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार आहेत.

इतर मागासवर्गीय प्रवर्ग : या प्रवर्गातून माजी मंत्री अनिल वसंत पाटील, सुनील प्रकाश देवरे, कुलभूषण वीरभाण पाटील आणि चंद्रकांत रामधन बाविस्कर हे चार उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग : या मतदारसंघातून अंबादास मधुकर गोसावी, काशिनाथ देवराम जावरे, सुरेश पुना धनके, मोरसिंग गोपा राठोड आणि विकास ज्ञानेश्वर वाघ हे पाच उमेदवार रिंगणात आहेत.

इतर सहकारी संस्था : या मतदारसंघातून खिलचंद सुरेश इंगळे, प्रशांत लिलाधर चौधरी, विशाल गुलाबराव देवकर आणि विकास उखडू नारखेडे यांच्यात लढत रंगणार आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांनी १२ जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला असला, तरी उर्वरित जागांवरील लढती राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. विशेषतः मुक्ताईनगरमधील खासदार रक्षा खडसे यांची लढत, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील माजी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरील आव्हान आणि चाळीसगावमधील आमदार मंगेश चव्हाण यांची निवडणूक याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी झालेल्या राजकीय हालचालींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र बदलले आहे. १२ जागांवर बिनविरोध निवड झाल्यानंतर उर्वरित नऊ जागांसाठी कोण बाजी मारणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेच्या आगामी संचालक मंडळातील सत्तासमीकरण ठरविण्याच्या दृष्टीने या निवडणुकीचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version