जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; १२ जागा बिनविरोध!
माघारीनंतर आठ मतदारसंघांतील नऊ जागांचे चित्र स्पष्ट; रक्षा खडसे, अनिल पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीला अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी निर्णायक वळण मिळाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून, तब्बल १२ जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागांमध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांचा समावेश असून, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या जागांवर प्रतिनिधित्व निश्चित केले आहे.
दुसरीकडे, आठ मतदारसंघांतील उर्वरित नऊ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार असल्याने जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष या लढतींकडे लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी माघारीनंतर निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली.
बिनविरोध झालेल्या १२ जागांमध्ये शिवसेनेचे सहा, भाजपचे चार, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार आहेत.
शिवसेनेचे सहा संचालक बिनविरोध
बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये शिवसेनेच्या सहा उमेदवारांचा समावेश आहे. धरणगाव विकासो मतदारसंघातून गुलाबराव पाटील, अनुसूचित जमाती प्रवर्गातून चंद्रकांत सोनवणे, पाचोरा विकासो मतदारसंघातून सुमित पाटील, भडगावमधून सोमसिंग खुमानसिंग पाटील, एरंडोलमधून मृणाल अमोल पाटील आणि पारोळा मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध
भाजपकडून जामनेर विकासो मतदारसंघातून मंत्री गिरीश दत्तात्रय महाजन, भुसावळमधून रजनी संजय सावकारे, चोपड्यातून रोहित दिलीप निकम आणि बोदवडमधून मधुकर रामचंद्र राणे हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमळनेर विकासो मतदारसंघातून जयश्री अनिल पाटील आणि धरणगाव विकासो मतदारसंघातून सोनल संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नऊ जागांसाठी आठ मतदारसंघांत निवडणूक
बिनविरोध निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता आठ मतदारसंघांतील नऊ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये मुक्ताईनगर, यावल, रावेर, चाळीसगाव, महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग आणि इतर सहकारी संस्था या मतदारसंघांचा समावेश आहे.
मुक्ताईनगर : तालुका विकासो प्रतिनिधी मतदारसंघातून खासदार रक्षा निखिल खडसे आणि देवयानी चंद्रकांत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे.
यावल : या मतदारसंघात प्रशांत लिलाधर चौधरी, गणेश गिरधर नेहेते, रामदास गोंडू पाटील आणि विनोदकुमार पंडितराव पाटील हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
रावेर : येथे राजेंद्र पंढरीनाथ चौधरी, योगीराज गबाजी पाटील आणि रमेश नगराज पाटील यांच्यात लढत होणार आहे.
चाळीसगाव : तालुका विकासो प्रतिनिधी मतदारसंघात आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्यासमोर नारायण नथू पाटील आणि विजय भिकनराव पाटील यांचे आव्हान आहे.
महिला प्रतिनिधी : या मतदारसंघातील दोन जागांसाठी माधुरी चंद्रशेखर अत्तरदे, ज्योती नाना पाटील, पुनम प्रशांत पाटील आणि सुलोचना भगवान पाटील या चार उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती असणार आहे.
इतर मागासवर्गीय प्रवर्ग : या प्रवर्गातून माजी मंत्री अनिल वसंत पाटील, सुनील प्रकाश देवरे, कुलभूषण वीरभाण पाटील आणि चंद्रकांत रामधन बाविस्कर हे चार उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग : या मतदारसंघातून अंबादास मधुकर गोसावी, काशिनाथ देवराम जावरे, सुरेश पुना धनके, मोरसिंग गोपा राठोड आणि विकास ज्ञानेश्वर वाघ हे पाच उमेदवार रिंगणात आहेत.
इतर सहकारी संस्था : या मतदारसंघातून खिलचंद सुरेश इंगळे, प्रशांत लिलाधर चौधरी, विशाल गुलाबराव देवकर आणि विकास उखडू नारखेडे यांच्यात लढत रंगणार आहे.
दिग्गजांच्या लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांच्या १२ जागा बिनविरोध झाल्या असल्या, तरी उर्वरित नऊ जागांवरील निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः मुक्ताईनगरमधील खासदार रक्षा खडसे यांची लढत, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील माजी मंत्री अनिल पाटील यांची निवडणूक आणि चाळीसगावमधील आमदार मंगेश चव्हाण यांच्यासमोरील आव्हान याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी झालेल्या घडामोडींनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. १२ जागांवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आता उर्वरित नऊ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यामुळे या लढतींचे निकाल आणि त्यातून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात निर्माण होणारे राजकीय समीकरण याबाबत उत्सुकता वाढली आहे.
