ज्येष्ठ कवी दासू वैद्य जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक!
कविता, गीतलेखन आणि ललित लेखनाचा समृद्ध प्रवास; २८ व २९ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे साहित्यिक मेजवानी
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : मराठी कवितेला समकालीन जीवनाचे भान देणारे आणि आपल्या संवेदनशील, आशयगर्भ लेखनातून वाचकांच्या मनावर वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ कवी, गीतकार व साहित्यिक दासू वैद्य हे जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे संमेलनाच्या साहित्यिक वातावरणात विशेष रंगत येणार आहे.
कविता, बालसाहित्य, ललित लेखन, नभोनाट्य, एकांकिका तसेच चित्रपट गीतलेखन अशा विविध साहित्यप्रकारांत दासू वैद्य यांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटवला आहे. आशयाची खोली, भाषेतील सहजता आणि समकालीन वास्तवाचे संवेदनशील भान ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. विविध साहित्यप्रकारांतील त्यांच्या योगदानामुळे मराठी वाङ्मयविश्व समृद्ध झाले आहे.
२८ व २९ नोव्हेंबरला साहित्यिक सोहळा
महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे हे संमेलन होणार आहे.
संमेलनाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ कवी दासू वैद्य यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. संघर्ष सावळे यांनी दिली. साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि वाचकांसाठी हे संमेलन वैचारिक व साहित्यिक देवाणघेवाणीचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
