जिल्हा बँकेत गुलाबभाऊंची बिनविरोध बाजी; पाळधीत शिवसैनिकांचा जल्लोष!
शिवसेना-युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जंगी सत्कार; फुलहार, पेढे आणि घोषणांनी शासकीय विश्रामगृह दुमदुमले
पाळधी/जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने पाळधीत शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांनी गुलाबभाऊंचे फुलहार घालून, पेढे भरवून आणि घोषणांच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
बिनविरोध निवडीबद्दल व्यक्त केला आनंद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेना-युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील यांचा सत्कार केला. फुलहार, पेढे आणि घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत गुलाबराव पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या हितासाठी प्रयत्नशील राहणार – गुलाबराव पाटील
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, “सामान्य माणसाच्या विश्वासावरच माझा आजवरचा राजकीय प्रवास उभा राहिला आहे. जिल्हा बँकेतील बिनविरोध निवड ही माझ्यासाठी सन्मानाबरोबरच मोठी जबाबदारी आहे. शेतकरी, सभासद आणि सहकारी संस्थांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. कार्यकर्त्यांचे हे प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे.”
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
याप्रसंगी दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख शिवराज पाटील, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, माजी सरपंच तथा विकास सोसायटीचे चेअरमन जितेंद्र पाटील, पाळधीचे सरपंच विजय, उद्योजक बापू पाटील, अनिल कासट, माजी सरपंच अरुण पाटील यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि जीपीएस ग्रुपचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीपीएस ग्रुपचे संचालक प्रशांत झंवर यांनी केले, तर युवासेनेचे आबा माळी यांनी आभार मानले.
