Spread the love

दिव्याने घेतला पेट; शेतातील झोपडी जळून खाक!

कावठी येथील आगीत कापूस, अन्नधान्य, रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्याची राख; माजी सरपंच शरद शिंदे यांच्याकडून पीडित कुटुंबाला १० हजारांची मदत

धुळे | प्रतिनिधी : झोपडीत लावलेल्या दिव्याने अचानक पेट घेतल्याने शेतातील झोपडी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना कावठी येथे घडली. या आगीत सुखराम सुपडू भील यांच्या झोपडीतील कापूस, अन्नधान्य, रोख रक्कम आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे भील कुटुंबाचा संसार उघड्यावर आला असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

आगीत संसारोपयोगी साहित्याची राख

शेतातील झोपडीत लावलेल्या दिव्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीने काही वेळातच झोपडीला वेढा घातल्याने झोपडीतील साहित्य वाचविण्याची संधी मिळाली नाही. या आगीत कापूस, घरातील अन्नधान्य, रोख रक्कम तसेच दैनंदिन वापरातील साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे सुखराम भील यांच्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

माजी सरपंचांकडून तातडीची मदत

या घटनेची माहिती मिळताच कावठी येथील माजी सरपंच शरद शिंदे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी तातडीने १० हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन संकटात सापडलेल्या कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या मदतीचे परिसरातून कौतुक होत आहे.

पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबाला या संकटातून सावरण्यासाठी प्रशासनाने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version