Spread the love

प्रल्हाद सोनवणे यांची कोळी महासंघाच्या खान्देश संपर्कप्रमुखपदी नियुक्ती!

माजी आमदार रमेशदादा पाटील व युवा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; जळगाव पूर्व-पश्चिम जिल्हाध्यक्षांसह महानगराध्यक्षांचीही निवड

जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) : आदिवासी कोळी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सोनवणे यांची कोळी महासंघाच्या खान्देश संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा पाटील आणि युवा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते १५ नोव्हेंबर रोजी लोणावळा येथे झालेल्या राज्यस्तरीय विशेष विचारविनिमय बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

याच बैठकीत जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी हरिलाल कोळी, पश्चिम जिल्हाध्यक्षपदी संदीप कोळी, तर महानगराध्यक्षपदी भगवान सोनवणे यांचीही नियुक्ती करण्यात आली.

समाजहिताच्या कार्याची दखल

प्रल्हाद सोनवणे यांनी अनुसूचित जमातीतील आदिवासी कोळी समाजातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील महिला आणि विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आदिवासी कोळी महासंघाच्या माध्यमातून विविध सामाजिक अधिवेशने, मेळावे, आंदोलने, उपोषणे आणि मोर्चांमध्ये सहभागी होत समाजाचे प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे.

समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, समाजबांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. भाजप अनुसूचित जमाती मोर्चातही ते कार्यरत असून, रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. समाजाची एकजूट, संघटनशक्ती आणि सामाजिक हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर खान्देश संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे.

लोणावळ्यात राज्यस्तरीय बैठकीत नियुक्ती

भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने १५ नोव्हेंबर रोजी लोणावळा येथे कोळी महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय विशेष विचारविनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील आणि युवा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, प्रदेश नेते सतीश धडे, देवानंद भोईर, उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटकर, जळगाव जिल्हा प्रभारी जितेंद्र सपकाळे, सिद्धेश्वर कोळी, शानाभाऊ सोनवणे, डी. एम. कोळी, युवराज सैंदाणे, सुभाष सोनवणे, नितीन कांडेलकर, देविदास कोळी, बबलू कोळी यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते, विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

खान्देशात संघटन बळकट करण्याचा निर्धार

प्रल्हाद सोनवणे यांच्या नियुक्तीमुळे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, मालेगाव, भुसावळ आणि अहिल्यानगर परिसरातील कोळी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

खान्देश विभागात कोळी महासंघाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, सामाजिक कार्याची आवड असलेल्या महिला-भगिनी, युवक आणि समाजबांधवांना संघटित करणे, तसेच समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महासंघाच्या माध्यमातून नव्या जोमाने कार्य केले जाईल, असा विश्वास नवनियुक्त खान्देश संपर्कप्रमुख प्रल्हाद सोनवणे यांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version