Spread the love

मॅसानिक लॉजच्या प्रकरणी तहसीलदारांचे सह दुय्यम निबंधकांना आदेश!

वादग्रस्त मिळकतींचे व्यवहार रोखण्याचे निर्देश; नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश, केदारनाथ सानप यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची दखल

भुसावळ (संघरत्न सपकाळे) : भुसावळ येथील मॅसानिक लॉज तसेच संबंधित इतर मिळकतींचे खरेदी-विक्री व्यवहार होऊ नयेत, यासाठी या मिळकती प्रतिबंधित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश तहसीलदार भुसावळ यांनी सह दुय्यम निबंधकांना दिले आहेत. संबंधित मिळकतींच्या व्यवहारांबाबत नियमानुसार आवश्यक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

बेकायदेशीर व्यवहारांबाबत तक्रारी

भुसावळ येथील मॅसानिक लॉज आणि इतर संबंधित मिळकतींच्या संदर्भात कथित कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत व बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या व्यवहारांपासून सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे, यासाठी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेत सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी चौकशी केली. त्यानंतर तहसीलदार भुसावळ यांनी संबंधित मिळकतींचे अभिलेख तपासून, अटींचा भंग झाल्याचे आढळल्यास पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले होते. तसेच तहसीलदारांकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत मॅसानिक लॉज व संबंधित वादग्रस्त मिळकतींचे व्यवहार होऊ नयेत, यासाठी मिळकती प्रतिबंधित करण्याचे आदेश देण्यात आले होते.

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची हालचाल

यापूर्वी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करीत केदारनाथ सानप यांनी भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तहसील प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली.

तहसीलदार भुसावळ यांनी सह दुय्यम निबंधकांना पत्राद्वारे मॅसानिक लॉज आणि संबंधित मिळकतींचे व्यवहार होऊ नयेत, या मिळकती प्रतिबंधित करण्यासाठी नियमानुसार आवश्यक कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.

प्रशासनाच्या या आदेशामुळे संबंधित मिळकतींच्या व्यवहारांबाबत पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले असून, अभिलेख तपासणी आणि चौकशीच्या निष्कर्षानुसार काय निर्णय घेतला जातो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version