NH-753 L वरील नाडगाव–हिंगणा फाट्यादरम्यानचा खड्डा ठरतोय जीवघेणा; वर्षभरापासून प्रशासनाचे दुर्लक्ष!
आतापर्यंत १८ ते २० अपघात; नारळ वाहतूक करणारा ट्रक मध्यरात्री उलटला, चालक सुखरूप
बोदवड प्रतिनिधी | नाडगाव : छत्रपती संभाजीनगर ते इंदूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-753 L वरील नाडगाव ते हिंगणा फाट्यादरम्यान असलेला मोठा खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. गेल्या वर्षभरापासून या खड्ड्याची समस्या कायम असून, संबंधित प्रशासनाकडून त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. या खड्ड्यामुळे आतापर्यंत सुमारे १८ ते २० अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातांमध्ये पाच चारचाकी वाहने, दहा दुचाकी आणि तीन ट्रकचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. वारंवार अपघात घडूनही खड्डा बुजविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मध्यरात्री नारळ वाहतूक करणारा ट्रक उलटला
शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास म्हैसूर येथून दिल्लीच्या दिशेने नारळ घेऊन जाणारा ट्रक या खड्ड्यामुळे अपघातग्रस्त झाला. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे चालकाला रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रक खड्ड्यातून उडाला. यावेळी ट्रकचा पाटा तुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. सुदैवाने या अपघातात चालक सुखरूप बचावला.
ट्रक उलटल्याने त्यातील नारळ रस्त्यावर विखुरले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र, अपघातानंतर रस्त्यावर पडलेले नारळ गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचेही पाहायला मिळाले.
MSRDC च्या कार्यक्षेत्रातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
छत्रपती संभाजीनगर ते इंदूर हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून, संबंधित रस्त्याचा हा भाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) कार्यक्षेत्रात असल्याचे सांगण्यात येते. या मार्गावर वारंवार अपघात होत असतानाही संबंधित विभागाकडून खड्डा दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गंभीर अपघाताची वाट पाहू नका!
नाडगाव–हिंगणा फाट्यादरम्यानचा हा खड्डा आता केवळ वाहनांचे नुकसान करणारा राहिलेला नसून प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण करणारा ठरत आहे. आणखी एखादा गंभीर अपघात घडण्यापूर्वी संबंधित MSRDC विभागाने तातडीने खड्डा बुजवावा, धोकादायक ठिकाणी स्पष्ट सूचना फलक लावावेत तसेच रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येण्यासाठी पुरेशी प्रकाशयोजना आणि सुरक्षा व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
