Spread the love

दुष्काळग्रस्त शेतकरी व गरजू महिलांना शिवसेनेतर्फे ‘आनंदाचा शिधा’ वाटप!

एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने भुसावळ तालुक्यातील खडका, किन्ही, साकेगाव व गोजोरा येथे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिवाळीचा आधार

भुसावळ (संघरत्न सपकाळे) : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजू महिलांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’ वाटप उपक्रम राबविण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार भुसावळ तालुक्यातील खडका, किन्ही, साकेगाव आणि गोजोरा परिसरात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या आणि दिवाळीनिमित्त शिधावाटप केले.

शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, शिवसेना जिल्हाध्यक्षा नंदा निकम आणि भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना सणासुदीच्या काळात दिलासा देण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.

शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न

शेतकरी हा समाजाचा कणा असून वर्षभर ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता तो शेतात मेहनत करतो. मात्र, अनेकदा आर्थिक संकटामुळे सण-उत्सव साजरे करताना शेतकरी कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आधार देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे महत्त्वाचे असल्याचे मत शिवसेनेचे माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिधावाटप करण्यामागे त्यांच्याशी आपुलकीचे नाते जपणे आणि दिवाळीच्या आनंदात सहभागी होण्याची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी शिवसेना

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. शिवसेना नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही शिवसेना जिल्हाध्यक्षा नंदा निकम यांनी दिली.

या उपक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश निकम, युवा सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष पवन भोळे, अल्पसंख्याक उपाध्यक्ष हमीद पठाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुष्काळाच्या सावटात सण साजरा करणाऱ्या शेतकरी कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा संदेश देण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version