Spread the love

संजय शर्मा यांच्याविरोधात कठोर कारवाईसाठी उद्या भाजपाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा!

वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टनंतर धुळ्यात तणाव; सकाळी १० वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात

धुळे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संजय शर्मा यांनी धुळ्याच्या महापौरांविषयी सोशल मीडियावर केलेल्या कथित वादग्रस्त पोस्टमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संजय शर्मा यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, उद्या रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत विशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजय शर्मा यांच्या पोस्टमुळे धुळ्यात राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या अवैध धंद्यांची माहिती द्या!

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार अनुप अग्रवाल यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या कथित अवैध धंद्यांबाबतही भूमिका स्पष्ट केली. भाजपाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचे दोन नंबरचे धंदे असतील, तर त्याची माहिती द्यावी, असे खुले आवाहन त्यांनी केले. या वक्तव्यामुळे पत्रकार परिषदेत राजकीय चर्चेला आणखी धार मिळाली.

कत्तलखान्याच्या मुद्द्यावरून सुरू होते सोशल मीडिया युद्ध

गेल्या अनेक दिवसांपासून धुळ्यात कत्तलखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरून भाजप पदाधिकारी आणि संजय शर्मा यांच्यात सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू होते. या वादाला संजय शर्मा यांच्या कथित वादग्रस्त पोस्टमुळे अधिक गंभीर वळण मिळाले. त्यानंतर शहरात तोडफोड झाल्याची घटना घडली आणि रात्री उशिरा आग्रा रोड परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

सीडीआर तपासणी, अवैध धंदे बंद करण्याची मागणी

संजय शर्मा यांच्या वादग्रस्त पोस्टमुळे भाजप पदाधिकाऱ्यांसह धुळेकरांमध्ये संताप व्यक्त होत असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले. संजय शर्मा यांचे सीडीआर तपासण्यात यावेत, शहरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत आणि संजय शर्मा यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी भाजपाच्या वतीने उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून भाजप आपली आक्रमक भूमिका प्रशासनासमोर मांडणार असून, धुळेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version