Spread the love

KBCच्या हॉटसीटवर जळगावचा डंका

जळगाव प्रतिनिधी : गरिबीने पिचलेल्या परिस्थितीशी दोन हात करताना हातात कष्टाची साधने होती, डोळ्यांत मात्र मोठी स्वप्ने होती. कधी उदरनिर्वाहासाठी नदीपात्रात रेती उपसण्याचे काम, तर कधी शिक्षणासाठी संघर्ष… अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि ज्ञानाची कास न सोडणाऱ्या रावेर तालुक्यातील भूषण ईश्वर ठाकरे याने थेट देशाच्या लोकप्रिय दूरचित्रवाणी मंचावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या अठराव्या पर्वात एक कोटी रुपये जिंकत भूषणने या सीजनचा पहिला करोडपती होण्याचा मान मिळविला आहे. विशेष म्हणजे, एक कोटींच्या रकमेसह चारचाकी वाहनही त्याने जिंकले असून, आता त्याचा प्रवास सात कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला आहे. भूषणच्या या यशाने जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

भूषण हा मूळचा बलवाडी, ता. रावेर येथील रहिवासी. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत त्याचे बालपण गेले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याला नदीपात्रात रेती उपसण्यासारखी कष्टाची कामे करावी लागली. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाची ओढ आणि आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखविण्याची महत्त्वाकांक्षा त्याने कधीही सोडली नाही. आर्थिक परिस्थितीने त्याच्या स्वप्नांना मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला; मात्र ज्ञानाच्या बळावर परिस्थिती बदलण्याचा त्याचा निर्धार कायम राहिला.

अधीक्षक कुंदन पाटील यांची भेट ठरली आयुष्याला कलाटणी

भूषणच्या आयुष्यात निर्णायक टप्पा आला तो भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, भुसावळ येथील अधीक्षक कुंदन पाटील यांच्या भेटीनंतर. भूषणची कौटुंबिक परिस्थिती, शिक्षणाची आवड आणि त्याच्यातील बुद्धिमत्ता ओळखून पाटील यांनी त्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास प्रोत्साहित केले.मात्र, त्यांचे योगदान केवळ प्रवेश मिळवून देण्यापुरते मर्यादित नव्हते. भूषणमधील गुणवत्ता ओळखून त्याला सातत्याने मार्गदर्शन, मानसिक आधार आणि आत्मविश्वास दिला. परिस्थितीपुढे हार न मानता ध्येय निश्चित करून त्यासाठी मेहनत करण्याची प्रेरणा दिली. योग्य वेळी मिळालेल्या या मार्गदर्शनामुळे भूषणच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.

‘काहीतरी बनल्याशिवाय घरी जाणार नाही!’

भूषणच्या जिद्दीची खरी ताकद त्याच्या एका निर्धारातून दिसून येते. वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात करताना त्याने तब्बल दीड वर्ष घरी जाणे टाळले. ‘काहीतरी बनल्याशिवाय मी घरी जाणार नाही,’ असा ठाम निर्धार त्याने अधीक्षक कुंदन पाटील यांच्यासमोर व्यक्त केला होता.त्याच्या या शब्दांमधून परिस्थिती बदलण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि कुटुंबासाठी काहीतरी मोठे करून दाखविण्याची तळमळ स्पष्ट होत होती. अनेक अडचणी असूनही अभ्यासातील सातत्य, ज्ञानाची आवड आणि स्वतःच्या क्षमतेवरील विश्वास यांच्या जोरावर त्याने आपला प्रवास सुरू ठेवला. आज कोट्यवधी प्रेक्षकांसमोर त्याने मिळविलेले यश हा त्याच निर्धाराचा प्रत्यय देणारा क्षण ठरला आहे.

एका संधीने संघर्षाचे सोने केले!

कधी उदरनिर्वाहासाठी नदीपात्रात कष्ट करणारा तरुण आज ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर विराजमान झाला आहे. आपल्या ज्ञानाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर एक कोटी रुपयांची रक्कम जिंकत त्याने देशभरात स्वतःची ओळख निर्माण केली. आता सात कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्याने त्याच्या पुढील कामगिरीबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

भूषणचे यश हे केवळ एका स्पर्धकाचे वैयक्तिक यश नाही. आर्थिक परिस्थितीमुळे गुणवत्तेला संधी मिळत नाही, या समजुतीला छेद देणारी ही घटना आहे. योग्य वेळी मिळालेले मार्गदर्शन, उपलब्ध झालेली शैक्षणिक सुविधा आणि स्वतःची जिद्द यांच्या बळावर सामान्य कुटुंबातील विद्यार्थीही असामान्य यश संपादन करू शकतो, हे भूषणने दाखवून दिले आहे.

शासकीय वसतिगृहांच्या उद्देशाला मिळाली अधोरेखित करणारी यशोगाथा

भूषणच्या यशानिमित्ताने शासकीय वसतिगृहांच्या सामाजिक आणि शैक्षणिक भूमिकेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वसतिगृह म्हणजे केवळ निवास आणि भोजनाची सोय नसून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारे व्यासपीठ आहे.कुंदन पाटील यांच्यासारख्या संवेदनशील आणि विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखणाऱ्या मार्गदर्शकांची साथ मिळाल्यास अनेक भूषण घडू शकतात. एका विद्यार्थ्याला दिलेले प्रोत्साहन त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलू शकते, याचे भूषण हे जिवंत उदाहरण ठरले आहे.बलवाडीच्या मातीतून सुरू झालेला भूषणचा प्रवास आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. गरिबीवर मात करणारी जिद्द, शिक्षणावर असलेला विश्वास आणि योग्य मार्गदर्शनाची ताकद यांचा संगम म्हणजे भूषण ठाकरेची ही यशोगाथा. त्याच्या या कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्याचा अभिमान उंचावला असून, ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी त्याने आशेचा नवा किरण निर्माण केला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version