Spread the love

‘तहानलेल्यांना पाण्याचा घोट; थंडीने गारठलेल्यांना मायेची ऊब!’

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाळधीत जलसेवेचे लोकार्पण व गरजूंचे ब्लँकेट वाटप; जीपीएस मित्र परिवाराच्या दुहेरी सेवाउपक्रमाचे कौतुक

पाळधी/जळगाव (प्रतिनिधी) : समाजसेवा म्हणजे केवळ मोठमोठ्या घोषणा नव्हेत, तर गरज ओळखून माणसाच्या मदतीला धावून जाणे होय. तहानलेल्या वाटसरूला शुद्ध पाण्याचा घोट आणि थंडीने कुडकुडणाऱ्या गरजूला मायेची ऊब देण्यातच खरी माणुसकी आहे. माणसाच्या अडचणीच्या काळात उपयोगी पडणारी माणसे हीच समाजाची खरी संपत्ती आहेत. जीपीएस मित्र परिवाराने सेवाभाव केवळ शब्दांत न ठेवता कृतीतून जपला आहे, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र कासट होते.

पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात जीपीएस मित्र परिवाराच्या पुढाकारातून आणि ज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र कासट यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. फिल्टर वॉटर मशीनचे लोकार्पण आणि गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पाळधी हे प्रमुख वाहतुकीचे केंद्र असल्याने येथून दररोज प्रवास करणारे वाटसरू, वाहनधारक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना या मोफत पाणी सुविधेचा लाभ होणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने उभारलेली ही सुविधा नागरिकांसाठी दिलासा ठरणार आहे. दुसरीकडे, वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर निराधार व गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप करून त्यांना उबदार आधार देण्याचा उपक्रमही राबविण्यात आला.

प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वातून सेवाकार्याला नवी दिशा

समाजकार्याचा ध्यास आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्परता हीच जीपीएस मित्र परिवाराची ओळख बनली आहे. युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूक्ष्म नियोजनातून परिवाराचे सेवाकार्य सातत्याने विस्तारत आहे.

आरोग्य शिबिरे, हजारो गरजू रुग्णांना मोतीबिंदू उपचारांसाठी मदत, निराधारांसाठी भोजन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, तसेच गरजू नागरिकांना उबदार कपड्यांचे वाटप अशा विविध उपक्रमांतून जीपीएस मित्र परिवार सामाजिक बांधिलकी जपत आहे. प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देत गरजवंतांपर्यंत मदत पोहोचविण्यावर प्रतापराव पाटील यांचा भर असतो. याच सेवाभावी वाटचालीत आता सार्वजनिक शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या सुविधेची भर पडली आहे.

शरदचंद्र कासट यांच्या दातृत्वाचा आदर्श!

या लोकोपयोगी उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य करणारे ज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र कासट यांच्या दातृत्वाचा यावेळी गौरव करण्यात आला. व्यवसायासोबतच सामाजिक भान जपत समाजोपयोगी कार्यासाठी योगदान देणारे त्यांचे दानशूर व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत झंवर यांनी केले, तर आभार माजी सरपंच अरुण पाटील यांनी मानले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, ज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र कासट, उद्योजक अनिल कासट, माजी सरपंच अरुण पाटील, शेतकी संघाचे गजानन पाटील, तालुका संघटक रवी चव्हाण सर, प्रशांत इंगळे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत इंगळे, अनिल सोनवणे, दिलीप माळी, मुकेश भोई, चेतन झंवर यांच्यासह जीपीएस मित्र परिवाराचे सदस्य आणि पाळधीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version