Spread the love

धुळ्यातील भाविकांवर काळाचा घाला; राजस्थानमध्ये भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू!

खाटू श्याम दर्शनाहून परतताना कोटा महामार्गावर दुर्घटना; उभ्या ट्रकला क्रुझरची धडक, सहा जण जखमी

धुळे (प्रतिनिधी) : खाटू श्याम देवाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील भाविकांवर काळाने घाला घातला. राजस्थानमधील कोटा महामार्गावर मध्यरात्री उभ्या असलेल्या ट्रकला मागून क्रुझर वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती धुळ्यात पोहोचताच मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : सजन दौलत पवार, उषाबाई सजन पवार, माधवी गणेश पवार, साऊ गणेश पवार, कैलास भगवान पवार, अनिता कैलास पवार, जानवी कैलास पवार, बाबूलाल दौलत पवार आणि सुशिलाबाई बाबूलाल पवार.

तर मनीषा शरद पवार, मयुरी शरद पवार, जगदीश कैलास पवार, श्रीजीत गणेश पवार, शरद बाबूलाल पवार आणि गणेश सय्यद पवार हे सहा जण जखमी झाले आहेत.

दर्शनाहून परतताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी धुळे जिल्ह्यातील तीन कुटुंबांमधील भाविक तीन स्वतंत्र क्रुझर वाहनांतून खाटू श्याम देवाच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू असताना त्यापैकी एका क्रुझर वाहनाला राजस्थानमधील कोटा महामार्गावर अपघात झाला. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला क्रुझरने मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल

अपघाताची माहिती मिळताच कोटा येथील स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेले आणि जखमी झालेले सर्वजण धुळे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

देवदर्शनासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या भाविकांवर परतीच्या प्रवासात काळाने झडप घातली. एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version