Spread the love

सोयगावात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे थाटात भूमिपूजन; शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते भूमिपूजन; आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा, हजारो शिवप्रेमींची उपस्थिती

सोयगाव (प्रतिनिधी – शिवराम जाधव) : नगरपंचायत सोयगावच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्याला सोयगाव शहरासह तालुक्यातील हजारो शिवप्रेमी, नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. भगवे फेटे, भगवे उपरणे, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती ना. सचिन अहिर यांच्या शुभहस्ते आणि आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरणही करण्यात आले.

भगव्या वातावरणात शिवप्रेमींचा जल्लोष

भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भगवे फेटे आणि उपरणे परिधान केलेले पदाधिकारी व नागरिक, ढोल-ताशांचा निनाद आणि शिवरायांच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. अनेक वर्षांपासून पाहिलेले स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याने सोयगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला विशेष उपस्थिती म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर (आबा) काळे आणि सिल्लोड नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार उपस्थित होते.

यावेळी सोयगावच्या नगराध्यक्षा आशाबी अशरफ तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई प्रभाकर काळे, गटनेते अक्षय विनायक काळे, मुख्याधिकारी संभाजी देशमुख तसेच नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

सोयगावच्या वैभवात पडणार भर

यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना हे स्मारक केवळ पुतळ्यापुरते मर्यादित राहणार नसून, पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. स्वराज्य, शौर्य, स्वाभिमान आणि रयतेच्या कल्याणाची शिकवण या स्मारकातून मिळेल. या स्मारकामुळे सोयगाव शहराच्या वैभवात निश्चितच भर पडेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सोयगावकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याने नागरिक आणि शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version