NQAS राष्ट्रीय पथकाची पळासखेडे आरोग्यवर्धिनी मंदिराला भेट
राष्ट्रीय गुणवत्ता हमी कार्यक्रमांतर्गत उपकेंद्राच्या कामकाजाची पाहणी; आरोग्यसेवांच्या दर्जाबाबत पथकाकडून समाधान व्यक्त
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
राष्ट्रीय गुणवत्ता हमी कार्यक्रम अर्थात NQAS (National Quality Assurance Standards) मूल्यांकनात राष्ट्रीय स्तरावर पात्र ठरलेल्या आयुष्मान आरोग्यवर्धिनी मंदिर, पळासखेडे येथे राष्ट्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान पथकाने आरोग्य उपकेंद्रातील विविध सेवा आणि कामकाजाचा आढावा घेतला. पाहणीनंतर पळासखेडे उपकेंद्राच्या कामकाजाबाबत राष्ट्रीय पथकाने समाधान व्यक्त केले.
राष्ट्रीय पथकामध्ये डॉ. अभिषेक जिनवल (डेप्युटी डायरेक्टर, लीगल अॅडव्हायझर, उज्जैन, मध्य प्रदेश), डॉ. संजय चौधरी (उदयपूर, राजस्थान), डॉ. करिष्मा जैन आणि श्रेया दीक्षित यांचा समावेश होता. पळासखेडे येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्रीय पथकाचे औक्षण करून तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर पथकाने आरोग्यवर्धिनी मंदिरातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णांची काळजी, परिसरातील स्वच्छता, औषध व्यवस्थापन, लसीकरण, माता-बाल संगोपन, प्रयोगशाळा सेवा तसेच आरोग्यविषयक नोंदींची अचूकता या महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आला. आरोग्यसेवांचा दर्जा अधिक प्रभावीपणे टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही पथकाने केले.
या पाहणीदरम्यान पळासखेडे उपकेंद्रातील आरोग्यसेवा आणि कामकाजाबाबत राष्ट्रीय पथकाने समाधान व्यक्त केले. राष्ट्रीय गुणवत्ता हमी कार्यक्रमांतर्गत मिळालेली ही पात्रता स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या कामगिरीला प्रोत्साहन देणारी ठरली आहे.
या प्रसंगी भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ, पिंपरखेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक भोसले यांच्यासह आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका आणि मदतनीस उपस्थित होते.
