२०१७ मध्ये निवडणुकीचे तिकीट, तर २०२६ मध्ये स्वीकृत नगरसेवकपदाची संधीही हुकली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे न्यायाची मागणी
पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पार्टीसाठी वर्षानुवर्षे निष्ठेने काम करूनही वारंवार राजकीय संधींपासून डावलले जात असल्याची खदखद भाजप कार्यकर्ते सचिन सुदाम काळभोर यांनी व्यक्त केली आहे. पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची संधी २०१७ मध्ये नाकारण्यात आली आणि २०२६ मध्येही स्वीकृत नगरसेवकपदासाठी डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणे हाच आपला गुन्हा आहे का, असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे न्यायाची मागणी केली आहे.
सचिन सुदाम काळभोर आणि दिलीप महादू राऊत यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी न मिळाल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे. पक्षासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार होत नसेल, तर पक्षनिष्ठेचे महत्त्व काय राहते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
२०१४ मध्ये अधिकृत उमेदवाराचा प्रचार केला, हीच चूक ठरली का?
आपल्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देताना काळभोर यांनी २०१४ मधील भोसरी विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला. या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार एकनाथ पवार यांच्या विजयासाठी आपण प्रामाणिकपणे प्रचार केला होता. मात्र, त्यानंतर स्थानिक राजकीय समीकरणांमुळे आपल्याला पक्षात काम करण्यापासून रोखण्यात आले आणि पुढील निवडणुकीतही संधी नाकारण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे.
२०१४ च्या निवडणुकीत महेश लांडगे अपक्ष उमेदवार होते. आपण भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे महेश लांडगे यांनी आपल्याबद्दल नाराजी ठेवली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही ही नाराजी कायम राहिल्याचा दावा काळभोर यांनी केला आहे. वेळोवेळी आपण त्यांच्या विरोधात निवडणुकीत काम केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करणे ही पक्षनिष्ठाच होती. मग त्याच भूमिकेचा राग आजही काढला जात असेल, तर पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेमके काय करावे, असा सवाल त्यांनी केला आहे.
दहा प्रभागांतील नागरी प्रश्नांसाठी संघर्ष; तरी राजकीय संधीपासून दूर!
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सुमारे दहा प्रभागांमध्ये नागरिकांच्या विविध नागरी समस्यांसाठी आपण सातत्याने काम करत असल्याचे काळभोर यांनी सांगितले. पाणीपुरवठा, रस्ते, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या अन्य प्रश्नांवर आंदोलने, मोर्चे आणि निवेदनांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केल्यामुळे काही पोलीस ठाण्यांमध्ये आपल्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, हे गुन्हे वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवताना दाखल झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
एकीकडे पक्षाच्या विचारधारेसाठी काम करायचे, दुसरीकडे नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करायचा आणि प्रत्यक्ष संधी देण्याची वेळ आली की डावलले जायचे, ही बाब मनाला वेदना देणारी असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.
पक्षश्रेष्ठींनी अन्यायाची दखल घ्यावी!
२०१७ मध्ये निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही आणि २०२६ मध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठीही विचार झाला नाही. दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर संधी हुकल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाते की नाही, असा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. “मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार केला. नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढलो. मग माझी चूक नेमकी काय? पक्षासाठी काम केल्याचे बक्षीस म्हणून मला वारंवार डावलले जात आहे का? निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या आणि संधीच्या वेळी बाजूला राहायचे का?” असा सवाल सचिन काळभोर यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून वस्तुस्थितीची दखल घ्यावी, पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा आणि भविष्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पक्षवाढीसाठी रस्त्यावर घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांना संधीच्या वेळी डावलले जात असेल, तर पक्षनिष्ठेचा सन्मान नेमका कुठे होतो? हा सचिन काळभोर यांनी उपस्थित केलेला प्रश्न आता भाजपच्या शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
— सचिन सुदाम काळभोर, भाजप कार्यकर्ता, पिंपरी-चिंचवड शहर
