Spread the love

बहुजन समाजाने बेलदार समाजाचा आदर्श घ्यावा; सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांचे प्रतिपादन

धरणगाव प्रतिनिधी | पाळधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील बेलदार समाजाने सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा स्वीकार करीत सागर कॉलनीतील निसर्गवासी ग. भा. सुकमाबाई फुलसिंग चव्हाण यांचा दशक्रिया व गंधमुक्ती विधी सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी प्रथमच सत्यशोधक पद्धतीने पार पडला. बेलदार समाजात अशा पद्धतीने विधी संपन्न होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सुनील, दिलीप, किशोर, विलास, तुषार आणि निवास फुलसिंग चव्हाण या बंधूंनी आपल्या मातोश्रींच्या निधनानंतर पारंपरिक कर्मकांड, अनावश्यक खर्च आणि अंधश्रद्धेला फाटा देत सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती विधी करण्याचा निर्णय घेतला. सत्यशोधक समाज संघाचे विधी संचालक सत्यशोधक शिवदास महाजन यांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला. दुःखाच्या प्रसंगातही विवेकवादी विचारांची कास धरणाऱ्या चव्हाण परिवाराच्या या निर्णयाचे सामाजिक स्तरातून महत्त्व अधोरेखित होत आहे.

यावेळी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. सत्यशोधक समाजाची विचारधारा, तिच्यामागील सामाजिक भूमिका आणि आजच्या काळातील तिची आवश्यकता याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात बेलदार समाजाने घेतलेला हा परिवर्तनवादी निर्णय निश्चितच अन्य बहुजन समाजांसाठी प्रेरणादायी आहे. रूढी-परंपरांच्या नावाखाली होणारे आर्थिक शोषण, अंधश्रद्धा आणि अनावश्यक कर्मकांड यांपासून समाजाने दूर राहून विवेकवादी व मानवतावादी विचार स्वीकारण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. संत-महापुरुषांच्या विचारांचा संदर्भ देत सत्यशोधक पद्धतीतील साधेपणा, आर्थिक बचत आणि विचारप्रधान दृष्टिकोनाचे महत्त्व त्यांनी विशद केले.

“बहुजन समाजाने बेलदार समाजाचा आदर्श घ्यावा,” असे आवाहनही पी. डी. पाटील यांनी याप्रसंगी केले.

कार्यक्रमात उपस्थितांना महात्मा फुले यांचे अमर जीवन आणि पी. डी. पाटील लिखित ‘आदर्श महामाता’ हे ग्रंथ भेटस्वरूपात देण्यात आले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला हातभार लावण्याच्या उद्देशाने चव्हाण परिवाराने सत्यशोधक समाज संघटनेला एक हजार रुपयांचा सहयोग निधीही सुपूर्द केला.

यावेळी देविदास चव्हाण, बाळू चव्हाण, रामदास चव्हाण, भीमदास चव्हाण, गुलाब चव्हाण, अशोक चव्हाण, फुलसिंग चव्हाण, संजय माळी, मानव मुक्ती मिशनचे तालुकाध्यक्ष रतिलाल माळी, कांतीलाल महाजन, प्रवीण पाटील यांच्यासह चव्हाण परिवारातील सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दुःखाच्या प्रसंगालाही सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची जोड देत चव्हाण परिवाराने घेतलेला हा निर्णय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून समाजाला विवेकवादी वाटेवर नेणारा ठरू शकतो. पाळधीतून सुरू झालेला हा सत्यशोधक विचारांचा पुढाकार इतर समाजांसाठीही प्रेरणेचा स्रोत ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version