Spread the love

सातबारा उताऱ्यावरील अन्य बँकेच्या कर्जाचे कारण देत पीक कर्ज नाकारण्याच्या प्रकारावर आक्षेप : बँकांना तातडीने सूचना देण्याची तहसीलदारांकडे मागणी

मलकापूर प्रतिनिधी : सातबारा उताऱ्यावर अन्य बँकेचे कर्ज असल्याचे कारण पुढे करून पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारले जात असल्याच्या तक्रारींनी आता जोर धरला आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक कोंडी थांबवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, संबंधित बँकांना तातडीने लेखी सूचना देऊन पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर व वितरित करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना दुसरीकडे बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर निविष्ठांच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. आगामी हंगामातील शेतीच्या नियोजनासाठी पीक कर्ज हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आर्थिक आधार असतो. मात्र, सातबारा उताऱ्यावर अन्य बँकेच्या कर्जाची नोंद असल्याचे कारण देत नव्याने पीक कर्ज देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या प्रकाराची गंभीर दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मलकापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पात्र शेतकऱ्यांना केवळ सातबारा उताऱ्यावरील अन्य बँकेच्या कर्जाच्या नोंदीचे कारण देऊन पीक कर्जापासून वंचित ठेवू नये. संबंधित प्रकरणांची वस्तुस्थिती तपासून नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच याबाबत सर्व संबंधित बँकांना तातडीने लेखी सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडताना बँकांच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, अशी भूमिका स्पष्ट केली. प्रशासनाने या प्रश्नात तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा; अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version