Spread the love

चार दिवसांपासून बेमुदत उपोषण; गटविकास अधिकाऱ्यांकडून अद्याप दखल नाही!

स्व. ज्ञानेश्वर गंगाराम शिंदे यांच्या सेवा, पीएफ व प्रलंबित देयकांचा प्रश्न ऐरणीवर; कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी

जामनेर प्रतिनिधी : भऱाडी ग्रामपंचायतीअंतर्गत स्व. ज्ञानेश्वर गंगाराम शिंदे यांच्या सेवासंबंधी नोंदी, प्रलंबित आर्थिक देयके आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी कुटुंबीयांनी २० नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत शांततामय उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला चार दिवस उलटूनही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी अद्याप ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्व. ज्ञानेश्वर गंगाराम शिंदे यांच्या सेवेसंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी करून प्रलंबित सेवा विषयक आणि आर्थिक देयकांचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना नियमानुसार न्याय मिळावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सेवा नोंदी, कागदपत्रे, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि इतर प्रलंबित देयकांची सविस्तर माहिती कुटुंबीयांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. संबंधित कागदपत्रांची तपासणी करून नियमांनुसार देय असलेली रक्कम आणि सेवा विषयक बाबींचा निपटारा करण्यात यावा, अशी उपोषणकर्त्यांची भूमिका आहे.

मात्र, चार दिवसांपासून शांततामय मार्गाने उपोषण सुरू असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेट किंवा ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असून, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उपोषणकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने मागण्यांची दखल घेऊन न्याय्य निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे. प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याची वेळ येऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणानंतर तरी पंचायत समिती प्रशासन जागे होणार का? स्व. ज्ञानेश्वर गंगाराम शिंदे यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांची दखल घेऊन गटविकास अधिकारी न्याय देण्यासाठी पुढाकार घेणार का? याकडे आता भऱाडी ग्रामस्थांसह तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version