Spread the love

चिंचवलीचे सुपुत्र मनिष भालेकर यांची राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी निवड!

राज्यस्तरीय स्पर्धेत पाच पदकांची कमाई; लांब उडी, चालणे आणि रिले प्रकारांत चमकदार कामगिरी

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या सातव्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स स्पर्धेत चिंचवली गावचे सुपुत्र आणि कुशल धावपटू मनिष भालेकर यांनी दमदार कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी चार रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण पाच पदके पटकावली. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे चिंचवली, खारेपाटण दशक्रोशीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या कामगिरीच्या जोरावर त्यांची आगामी राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत ५० वर्षांवरील वयोगटात मनिष भालेकर यांनी जिद्द, मेहनत आणि क्रीडा कौशल्याच्या जोरावर प्रभावी कामगिरी केली. लांब उडी स्पर्धेत त्यांनी १६ फूट ४ इंच झेप घेत द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक मिळवले. तर तिहेरी उडीमध्ये २९ फूट ४ इंच झेप घेत तृतीय क्रमांक पटकावून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.

याशिवाय ५००० मीटर चालण्याच्या खडतर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत त्यांनी आणखी एका रौप्य पदकाची कमाई केली. ४ × १०० मीटर महिला-पुरुष मिश्र रिले स्पर्धेत १ मिनिट १५ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले. तसेच ४ × १०० मीटर पुरुष रिले स्पर्धेत १ मिनिट २ सेकंदांची वेळ नोंदवून आणखी एका रौप्य पदकाची भर घातली.

अशा प्रकारे पाच विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत मनिष भालेकर यांनी पाच पदके आपल्या नावावर केली. विशेष म्हणजे, वयाच्या पन्नाशीनंतरही त्यांनी दाखवलेली जिद्द, सातत्य आणि क्रीडाप्रेम नव्या पिढीतील खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

या यशामुळे भालेकर यांची येत्या ८ ते १० जानेवारी २०२७ दरम्यान नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, राष्ट्रीय स्पर्धेतही ते यशाची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version