त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त एकवीरा देवी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!
विरोधी पक्षनेते दीपक खोपडे आणि संजय अंपळकर यांना पालखी उचलण्याचा मान; महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप
धुळे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खानदेश कुलस्वामिनी आई एकवीरा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडले. यानिमित्त मंदिर परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या पालखीला मनपा विरोधी पक्षनेते दीपक खोपडे आणि संजय अंपळकर यांना पालखी उचलण्याचा मान मिळाला. मिरवणुकीनंतर महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.
कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच एकवीरा देवी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहाटे पाच वाजता देवीचा दुग्धाभिषेक आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी बारानंतर मंदिर परिसरातून देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक पार पडली. यावेळी दीपक खोपडे आणि संजय अंपळकर यांनी पालखी उचलण्याचा मान स्वीकारला.
पालखी मिरवणुकीनंतर देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात अन्नदान आणि महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली. भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी मंदिरात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळच्या दीपोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एकवीरा देवी मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी केले.
यावेळी मंदिराचे ट्रस्टी सोमनाथ गुरव, मनपा विरोधी पक्षनेते दीपक खोपडे, संजय अंपळकर, अक्षय अंपळकर, मकरंद अंपळकर, स्नेहा संजय अंपळकर, कीर्ती अक्षय अंपळकर, अदिती मकरंद अंपळकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
