धमकीच्या ई-मेलनंतर न्यायालयीन कामकाज ठप्प; मेटल डिटेक्टर बंद असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पुणे : पुणे जिल्हा न्यायालयाला अवघ्या २१ दिवसांत दुसऱ्यांदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सोमवारी (दि. २३) न्यायालयीन परिसरात एकच खळबळ उडाली. ‘बॉम्ब धमाके… पुणे कोर्ट कॉम्प्लेक्स… २.३० बजे’ असा मजकूर असलेला धमकीचा ई-मेल दुपारी पावणेदोनच्या सुमारास न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर प्राप्त झाला. यानंतर पोलिसांसह बॉम्बशोधक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण न्यायालयीन परिसराची तपासणी केली. सुदैवाने या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. परिसर सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.
न्यायालयात नेहमीप्रमाणे सुनावण्या सुरू असतानाच धमकीच्या ई-मेलची माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आली. न्यायालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना कळविल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयीन कामकाज थांबविण्यात आले. न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक न्यायाधीश आणि कर्मचारी अशोका हॉलसमोरील मैदानात जमा झाले. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने न्यायालयीन इमारती, विविध दालने तसेच वकिलांच्या चेंबरची बारकाईने तपासणी केली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवेशद्वारांवर वकील आणि पक्षकारांची गर्दी झाली होती. तपासणी पूर्ण होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्यात आल्याने अनेक सुनावण्यांवर परिणाम झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी २ नोव्हेंबर रोजीही पुणे जिल्हा न्यायालयाला अशाच प्रकारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. त्यामुळे अवघ्या २१ दिवसांत दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकाराने न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बंद मेटल डिटेक्टर; सुरक्षा यंत्रणा केवळ नावालाच?
न्यायालयाच्या विविध प्रवेशद्वारांवर सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक यंत्रे बंद अवस्थेत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी मेटल डिटेक्टर कार्यरत नसतानाच सुरक्षारक्षकांचीही पुरेशी उपस्थिती नसते. त्यामुळे नागरिकांची या यंत्रणांना बगल देत सहज ये-जा सुरू असते. परिणामी, सुरक्षेसाठी उभारलेली यंत्रणा प्रत्यक्षात कितपत प्रभावी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पहिल्या धमकीच्या घटनेनंतरही सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचे चित्र दिसत आहे. न्यायालयाच्या विविध ठिकाणी जुने फर्निचर आणि इतर साहित्य पडून असल्याने अशा ठिकाणांची नियमित तपासणी होणेही आवश्यक आहे. सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणे, बंद मेटल डिटेक्टर तातडीने कार्यान्वित करणे आणि प्रत्येक प्रवेशद्वारावर काटेकोर तपासणी व्यवस्था उभारणे गरजेचे असल्याचे जिल्हा व सत्र न्यायालयातील फौजदारी वकील शुभम लोखंडे यांनी सांगितले.
