Spread the love

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे धाववणार १५ अनारक्षित विशेष गाड्या!

४ ते ८ डिसेंबरदरम्यान नागपूर, मुंबई आणि अमरावती मार्गावर विशेष रेल्वे सेवा; भुसावळ, जळगाव, अकोला, मूर्तिजापूरसह अनेक स्थानकांवर थांबे

भुसावळ (संघरत्न सपकाळे) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी, दादर येथे अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ४ ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत १५ अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-मुंबई, मुंबई-नागपूर आणि अमरावती-मुंबई मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामुळे विदर्भासह खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल होतात. या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे सेवांचे नियोजन केले आहे. या गाड्यांना अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, भुसावळ, जळगाव यांसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

नागपूर-मुंबई मार्गावर चार विशेष गाड्या

नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान चार एकेरी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

  • गाडी क्रमांक ०१२६० : ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता नागपूरहून सुटून ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.५५ वाजता मुंबईला पोहोचेल.

  • गाडी क्रमांक ०१६२ : ४ डिसेंबर रोजी रात्री ११.५५ वाजता नागपूरहून सुटून ५ डिसेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजता मुंबईला पोहोचेल.

  • गाडी क्रमांक ०१२६४ : ५ डिसेंबर रोजी सकाळी ७.४० वाजता नागपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता मुंबईला पोहोचेल.

  • गाडी क्रमांक ०१२६६ : ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता नागपूरहून सुटून ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.५५ वाजता मुंबईला पोहोचेल.

या गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबे असतील.

मुंबईहून नागपूरसाठी पाच विशेष गाड्या

मुंबईहून नागपूरकडे परतणाऱ्या अनुयायी आणि प्रवाशांसाठी पाच विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

  • गाडी क्रमांक ०१२४९ : ६ डिसेंबर रोजी रात्री ८.२५ वाजता मुंबईहून सुटून ७ डिसेंबर रोजी सकाळी ११.२० वाजता नागपूरला पोहोचेल.

  • गाडी क्रमांक ०१२५३ : ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.४० वाजता दादरहून सुटून त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल.

  • गाडी क्रमांक ०१२५१ : ७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईहून सुटून ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.५५ वाजता नागपूरला पोहोचेल.

  • गाडी क्रमांक ०१२५५ : ७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३५ वाजता मुंबईहून सुटून ८ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल.

  • गाडी क्रमांक ०१२५७ : ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता मुंबईहून सुटून त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल.

या गाड्यांना दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी येथे थांबे देण्यात आले आहेत.

अमरावती-मुंबई मार्गावरही विशेष रेल्वे

अमरावती आणि मुंबईदरम्यानही विशेष अनारक्षित गाड्या चालविण्यात येणार आहेत.

  • गाडी क्रमांक ०१२१८ : ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता अमरावतीहून सुटून ६ डिसेंबर रोजी पहाटे ५.२५ वाजता मुंबईला पोहोचेल.

  • गाडी क्रमांक ०१२१७ : ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता अमरावतीला पोहोचेल.

या गाड्यांना बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर येथे थांबे असतील.

१६ सामान्य डबे; सर्व गाड्या अनारक्षित

या विशेष गाड्यांची रचना १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल. सर्व गाड्या अनारक्षित स्वरूपात धावणार आहेत. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणाऱ्या आणि परतणाऱ्या अनुयायांना तसेच प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवेचा लाभ घेता येणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version