व्हॉलीबॉल, धावणे, बास्केटबॉल आणि मैदानी क्रीडा प्रकारांत सहा विद्यार्थ्यांची निवड; १ व २ डिसेंबरला बारामतीत रंगणार स्पर्धा
जळगाव : बारामती येथील शारदाबाई पवार नर्सिंग महाविद्यालयात १ व २ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या अंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे दोन्ही महाविद्यालयांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवी ओळख मिळाली आहे.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमधील पृथ्वीराज आडे आणि रोशनी पवार यांची व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी, तर नैना दांडेकर हिची पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमधील प्रणाली वाघ हिची बास्केटबॉल आणि भालाफेक या दोन क्रीडाप्रकारांसाठी, तर अंकिता बरेला हिची थाळीफेक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य प्रा. डॉ. विशाखा गणवीर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आगामी स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयासह जळगावचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
