मुलगी शिकली, तर गाव घडतं!
व्ही. जे. हायस्कूलमध्ये महिला व बालकल्याण समितीची प्रेरणादायी भेट; विद्यार्थिनींशी संवाद साधत बालविवाह, सुरक्षितता आणि हक्कांविषयी मार्गदर्शन
दै. जनसम्राट टाइम्स
नांदगाव (प्रतिनिधी – दीपक अंभोरे) : “मुलींना शिक्षण द्या, त्यांना सुरक्षित ठेवा आणि स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य द्या; तरच उद्याचा सशक्त समाज घडेल,” या सकारात्मक दृष्टिकोनातून नांदगाव नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने व्ही. जे. हायस्कूलला सदिच्छा व पाहणी भेट दिली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधत त्यांना शिक्षण, बालहक्क आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
समितीच्या सभापती ॲड. विद्याताई कसबे, सदस्य कल्पनाताई जगताप, योगिताताई खरोटे आणि गायत्रीताई शिंदे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. मुलींनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, आत्मविश्वासाने आपल्या अडचणी मांडाव्यात आणि कोणत्याही अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बालविवाहाविरोधात रोखठोक मार्गदर्शन
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सभापती ॲड. विद्याताई कसबे म्हणाल्या, “बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. तुमचे वय शिकण्याचे, स्वप्ने पाहण्याचे आणि स्वतःचे भविष्य घडविण्याचे आहे. कोणत्याही दबावाला बळी पडू नका. अडचण निर्माण झाल्यास घाबरून न जाता मोकळेपणाने बोला. तुमच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत.”
यावेळी बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालकांचे अधिकार, मुलींच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी तसेच प्रभागातील बाल संरक्षण समितीच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
शाळेतील सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी
समितीने शाळेतील सखी सावित्री समितीची कार्यपद्धती, तक्रार पेटीची उपलब्धता तसेच चाइल्ड हेल्पलाइन व अन्य मदत क्रमांक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत का, याची प्रत्यक्ष पाहणी केली. यासंदर्भात मुख्याध्यापक आणि शिक्षकांशीही सविस्तर चर्चा करण्यात आली.
शाळेच्या कार्यवाहीबद्दल समितीचे समाधान
पाहणीदरम्यान शासनाच्या निर्देशानुसार शाळेत विविध समित्या कार्यरत असून, त्यांच्या नियमित बैठका घेतल्या जात असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थिनींच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र शिक्षकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
यापूर्वी सभापतींनी महिला व बालकल्याण विभागामार्फत शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याबाबत पत्राद्वारे सूचना केल्या होत्या. या सूचनांची शाळा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी केली आहे. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन सुरक्षा रक्षकाची नियुक्तीही करण्यात आली आहे.
शाळेने केलेल्या या तत्पर आणि सकारात्मक कार्यवाहीबद्दल समितीने समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे कौतुक करताना सभापतींनी, “शाळा ही केवळ अभ्यासाची जागा नसून संस्कार आणि सुरक्षिततेचे दुसरे घर आहे. व्ही. जे. हायस्कूलने ही जबाबदारी चांगल्या प्रकारे जपली आहे,” असे गौरवोद्गार काढले.
समितीच्या या भेटीमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. मुलींचे शिक्षण, त्यांची सुरक्षितता आणि त्यांना मिळणारे हक्क याबाबत शाळा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम केल्यास सक्षम पिढी घडण्यास निश्चितच हातभार लागेल, असा संदेश या भेटीतून देण्यात आला.
