प्रलंबित मागण्यांसाठी सफाई कामगारांची आयुक्तांकडे धाव; दालनाबाहेर ठिय्या!
मागण्या मान्य न झाल्यास ६ डिसेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा; शेकडो सफाई कामगारांचा मनपा प्रशासनाविरोधात एल्गार
धुळे (प्रतिनिधी) : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी धुळे महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी आक्रमक भूमिका घेत मनपा आयुक्तांकडे धाव घेतली. मात्र आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेलेल्या कामगारांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आल्याने संतप्त कामगारांनी आयुक्तांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी शिष्टमंडळाने उपायुक्त हेमंत निकम यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास ६ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
सफाई कामगार संघटनेच्या वतीने मनपा प्रशासनासमोर पाच प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये दिवसातून चार वेळा घेतली जाणारी हजेरी दोन वेळा करण्यात यावी, २०१६ ते २०२६ या कालावधीतील शासकीय सुट्ट्यांचा पगार कर्मचाऱ्यांना तातडीने अदा करावा, महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पुन्हा स्वच्छतेच्या कामावर नियुक्त करावे, सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्ट्या लागू कराव्यात तसेच निलंबन काळातील १६ कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने अदा करावे, या मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचा संघटनेचा आरोप आहे. प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे आता मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे.
आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेलेल्या कामगारांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आल्याने त्यांनी दालनाबाहेर ठिय्या देत आपला संताप व्यक्त केला. यावेळी उपायुक्त हेमंत निकम यांच्याशी झालेल्या चर्चेत कामगारांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, ६ डिसेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्याने धुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपा प्रशासन या मागण्यांबाबत काय भूमिका घेते आणि कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात सफाई कामगार नेते विजय पवार, नागेश कंडारे, बापू खरात, किशोर मोरे यांच्यासह शेकडो सफाई कामगार सहभागी झाले होते.
