Spread the love

भुसावळात नाशिक विभागीय योगासन स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन!

योगामुळे निरोगी शरीर, एकाग्र मन आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडते – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

भुसावळ (प्रतिनिधी) : योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून निरोगी शरीर, एकाग्र मन आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच योग आणि क्रीडा क्षेत्रातही सातत्यपूर्ण सराव करून राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि ताप्ती स्कूल, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक विभागीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्या नीना कटलर यांच्या हस्ते झाले.

यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, योगासन राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

भारतीय योगपरंपरेला प्राचीन वारसा लाभला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे योगाला जागतिक स्तरावर विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांनी योगाला केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे मंत्री सावकारे यांनी सांगितले.

प्राचार्या नीना कटलर यांनीही योगाचे महत्त्व विशद करताना, योगामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक संतुलन आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले.

चार प्रकारांत रंगली योगासन स्पर्धा

या विभागीय स्पर्धेत नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांसह महानगर क्षेत्रांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आर्टिस्टिक सोलो, ट्रेडिशनल सोलो, आर्टिस्टिक पेअर आणि रिदमिक पेअर अशा चार प्रकारांत स्पर्धा पार पडली. सहभागी खेळाडूंनी योगासनांमधील लवचिकता, संतुलन, एकाग्रता आणि कलात्मक कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चंचल माळी, डॉ. प्रदीप साखरे, लक्ष्मीकांत नेमाडे, सुनील चौधरी, गणेश बोदडे, गणेश टिंटोरे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि प्रशिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असून, त्यामुळे खेळाडूंना पुढील स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version