Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेत राजकीय दबावाचा वापर करून गैरप्रकार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते अर्ज माघारीपर्यंतच्या प्रक्रियेत राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या दबावामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विशेष म्हणजे, एका उमेदवाराचा अर्ज जळगाव येथे नामंजूर करण्यात आल्यानंतर संबंधित उमेदवाराने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अपील केले. तेथे त्याचा अर्ज वैध ठरविण्यात आल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे. या प्रकरणासंदर्भात चाळीसगावच्या आमदारांनी युतीच्या मेळाव्यात प्रसारमाध्यमांसमोर माहिती देताना अर्ज नामंजूर होण्यापासून ते अपिलात मंजूर होण्यापर्यंतच्या घडामोडींची कबुली दिल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.

सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्री यांच्याकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोपही आघाडीने केला आहे. पैशाचा, सत्तेचा आणि बळाचा वापर करून अनेक जागा बिनविरोध करण्यात आल्याचा दावा करत उर्वरित नऊ जागांसाठीही मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखविणे आणि दडपशाहीचे प्रकार सुरू असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जांची छाननी, अर्ज नामंजूर करण्यामागील कारणे, अपिलातील निर्णय आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे.यावेळी अशोक लाडवंजारी, राजू मोरे, अमोल कोल्हे, किरण राजपूत, सुनील भैय्या माळी, गिरीश सांगळे, गणेश पाटील, राहुल भालेराव, रफीक पटेल, सुहास चौधरी, अबजेत खाटीक, इब्राहिम खान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version