महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात एरंडोलमध्ये क्रांतिकारी सत्यशोधक विवाह!
अंधश्रद्धा, कर्मकांडांना फाटा देत अश्विन-माधुरी विवाहबद्ध; “प्रत्येकाने सत्यशोधक विचारांचा अंगीकार करावा” – माजी आमदार महेंद्रसिंग पाटील
बोरसे व सोनवणे परिवाराचे परिवर्तनवादी पाऊल; “अशा विवाहांचा आदर्श समाजाने घ्यावा” – पी. डी. पाटील
एरंडोल / धरणगाव (प्रतिनिधी) : क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून एरंडोल येथे अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अनावश्यक रूढींना फाटा देत सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा उत्साहात पार पडला. अश्विन आणि माधुरी या नवदांपत्याने परिवर्तनवादी विचारांचा स्वीकार करीत सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. या विवाह सोहळ्याने सामाजिक परिवर्तनाचा आणि समतेचा प्रेरणादायी संदेश दिला.
महात्मा फुले स्मारकाजवळील माळीवाडा परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा व रितेश रामा माळी यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक रुपेश रामा माळी आणि माजी उपनगराध्यक्ष सुनीता रुपेश माळी यांचे पुतणे सत्यशोधक अश्विन यांचा तळई येथील आनंद धर्मराज चौधरी यांची कन्या सत्यशोधिका माधुरी यांच्याशी विवाह रा. ती. काबरे विद्यालयाच्या मैदानावर पार पडला. सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी विवाहविधी संपन्न केला.
महामानवांच्या विचारांनी सजला विवाह मंडप
विवाह मंडपाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे फलक व प्रेरणादायी संदेश लावण्यात आले होते. नवदांपत्याने क्रांतीची मशाल हातात घेऊन विवाह मंडपात प्रवेश केला. प्रवेशद्वारावरील महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी कार्याची तसेच सत्यशोधक समाजाच्या विचारांची सविस्तर माहिती दिली. बहुजन समाजाने अंधश्रद्धा आणि कर्मकांडांपासून दूर राहून सत्यशोधक विचारांचा अंगीकार करावा. विवाहासह सर्व सामाजिक विधी सत्यशोधक पद्धतीने करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
बोरसे व सोनवणे परिवाराने उचललेले हे पाऊल खऱ्या अर्थाने क्रांतिकारी असून, इतरांनीही या परिवाराचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन पी. डी. पाटील यांनी केले.
गावागावांत सत्यशोधक विवाह व्हावेत – महेंद्रसिंग पाटील
माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी या सत्यशोधक विवाहाचे विशेष कौतुक केले. प्रत्येकाने सत्यशोधक विचारांवर चालून सत्यशोधक पद्धतीने विवाह करावेत. तालुक्यातील गावागावांत असे विवाह सोहळे संपन्न होणे हीच महामानवांना खरी आदरांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मंगलाष्टकांऐवजी विचारांचा जागर; अक्षतांऐवजी फुलांची उधळण
या विवाह सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विवाह मंडपातील विचारपीठावर वधू-वरांच्या माता-पिता तसेच मामा-मामी यांना सन्मानपूर्वक स्थान देण्यात आले. सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी महात्मा फुले रचित ‘सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर’ या अखंडाने सोहळ्याची सुरुवात केली. त्यानंतर सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी महात्मा फुले यांनी रचलेल्या मराठी मंगलाष्टकांचे गायन केले.
पारंपरिक अक्षतांऐवजी नवदांपत्यावर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. या अनोख्या पद्धतीने उपस्थितांचे लक्ष वेधले.
अंधश्रद्धामुक्त जीवन जगण्याची नवदांपत्याची शपथ
या सोहळ्यात नवदांपत्याने उपस्थितांच्या साक्षीने अंधश्रद्धा आणि कर्मकांडांचे आचरण करणार नाही, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार जीवन जगू, अशी सामूहिक शपथ घेतली.
माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार, ज्ञानेश्वर महाजन आणि पी. डी. पाटील यांच्या हस्ते नवदांपत्याला सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या विवाह सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, माजी सभापती शालिकभाऊ गायकवाड, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, पोलीस निरीक्षक सुनील पवार, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगराध्यक्ष समाजभूषण देविदास महाजन, माजी चेअरमन दुर्गादास महाजन, संजय महाजन, आरटीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आबासाहेब वाघ, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन, तालुकाध्यक्ष हिलाल फुलारी, जिल्हा सचिव कविराज पाटील, पत्रकार प्रवीण महाजन आणि दिनेश महाजन यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोरसे व सोनवणे परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल महाजन यांनी केले, तर नगरसेवक अनिल महाजन यांनी आभार मानले.
महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात पार पडलेला हा सत्यशोधक विवाह केवळ दोन जीवांचे मिलन न ठरता अंधश्रद्धामुक्त, विवेकवादी आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या दिशेने टाकलेले प्रेरणादायी पाऊल ठरला. परंपरेला विवेकाची जोड देत सामाजिक परिवर्तनाचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा संदेश या विवाह सोहळ्यातून देण्यात आला.
