शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या हक्कासाठी ऑल इंडिया पँथर सेना रस्त्यावर!
मुक्ताईनगर येथे विमा प्रतिनिधी, कृषी अधिकारी व तहसीलदारांना निवेदन; विम्यातील तफावत दूर करून संपूर्ण रक्कम देण्याची मागणी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची संपूर्ण पीक विम्याची रक्कम मिळावी, तसेच विमा रकमेत झालेली तफावत दूर करण्यात यावी, या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेने आज मुक्ताईनगर येथे पुढाकार घेतला. संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील यांच्या नेतृत्वाखाली विमा प्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.
ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी संघटनेने मांडल्या. अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित विमा रक्कम मिळत नसून, मंजूर रकमेत तफावत असल्याचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला. शेतकऱ्यांची कथित फसवणूक थांबवून त्यांना त्यांच्या हक्काची पूर्ण विमा रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील, उपजिल्हाध्यक्ष अजय शेलार, जिल्हा महासचिव आदित्य गजरे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार!
शेतकऱ्यांच्या घामाचा आणि कष्टाचा मोबदला त्यांना मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना शेवटपर्यंत लढा देईल, असा निर्धार जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील यांनी व्यक्त केला. पीक विम्याची संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटनेचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
