Spread the love

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; तरुणावर जीवघेणा हल्ला!

किरकोळ वादातून गोळीबार; जयेश पवार गंभीर जखमी, पत्नीच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांत गुन्हा नोंद

भडगाव प्रतिनिधी – गणेश रावळ

भडगाव : तालुक्यातील कजगाव येथे गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोडगाव-कजगाव रस्त्यावरील सोलर प्लान्टजवळ एका तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत जयेश नाना धोबी (पवार) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भडगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयेश पवार हा २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता पारोळा रस्त्यावरील सोलर कंपनीत कामासाठी जात होता. त्यावेळी गोडगाव-कजगाव रस्त्यावरील सोलर प्लान्टजवळ त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून मुन्ना उर्फ गिरीष मुक्तारसिंग राजपूत व अन्य दोन इसमांनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या गोळीबारात जयेश पवार गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकारामुळे कजगावसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

जखमी जयेश पवार यांच्या पत्नी दिव्या जयेश पवार (रा. कजगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मुन्ना उर्फ गिरीष मुक्तारसिंग राजपूत व अन्य दोन इसमांविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८९/२०२६ असून, भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच आर्म्स ॲक्ट कलम ३/२५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, भडगाव पोलिस निरीक्षक महेश टाक, पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत. गोळीबारानंतर संशयित हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version