Spread the love

दंडाची रक्कम भरल्यानंतर वाळूची तीन वाहने मुक्त; उर्वरित दोन वाहनांच्या प्रक्रियेकडे लक्ष!

पाचोरा प्रांताधिकाऱ्यांच्या अधिकृत आदेशाने वाहनांची सुटका; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम ४८ अन्वये कारवाई

भडगाव (प्रतिनिधी – गणेश रावळ) :

अवैध गौणखनिज व वाळू वाहतुकीप्रकरणी महसूल प्रशासनाने जप्त केलेल्या वाहनांपैकी दंडाची रक्कम शासन जमा केलेल्या तीन वाहनांना पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांच्या अधिकृत आदेशानुसार मुक्त करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणात एकूण पाच वाहनांचा दंड भरण्यात आला असून, त्यापैकी तीन वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. उर्वरित दोन वाहनांच्या कागदपत्रांची आणि कायदेशीर पडताळणीची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ अन्वये महसूल प्रशासनाकडून करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईनंतर शासनाकडे दंडाची रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने तीन वाहने मुक्त करण्यात आली.

या तीन वाहनांना मिळाली मुक्तता

दंडाची रक्कम शासन जमा केल्यानंतर मुक्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये शिवाजी रमेश पाटील यांच्या मालकीची दोन वाहने असून, त्यांचे क्रमांक MH 14 MT 2416 आणि MH 04 KF 9360 असे आहेत. तसेच समाधान बोरसे यांचे MH 41 BX 0292 क्रमांकाचे वाहनही मुक्त करण्यात आले आहे.

उर्वरित दोन वाहनांच्या प्रक्रियेकडे लक्ष

प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात एकूण पाच वाहनांचा दंड भरण्यात आला होता. त्यापैकी तीन वाहनांना प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने मुक्तता मिळाली आहे. मात्र, उर्वरित दोन वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी आणि आवश्यक कायदेशीर पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही वाहनांच्या सुटकेसाठी पुढील प्रशासकीय प्रक्रियेवर संबंधितांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version